गुंठाभर शेती ते कंपनीच्या डिरेक्टर अर्चना भोसले यांची संघर्षमय यशोगाथा
एक गुंठा शेती ते आज कंपनीच्या डिरेक्टर ! पाहुयात अर्चना भोसले यांचा प्रवास...
काहीही न समजण्याच्या वयात चौथीला असताना अर्चना भोसले यांचे लग्न होऊन त्या नांदायला आल्या. सासरची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आल्यामुळे नवरा देखील रोजंदारी करायचा. अशा गरिबीने ग्रासलेल्या पण काहीतरी करायचे या जिद्दीने पेटून उठलेल्या अर्चना भोसले यांनी सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली व तिथपासून सुरू झालेला हा प्रवास एका कंपनीच्या डिरेक्टर इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. हे सर्व कस शक्य झालं? त्या यशाच्या शिखरावर कश्या पोहोचल्या? याच अर्चना भोसले यांच्या संघर्षमय प्रवासाची यशोगाथा पुढे आपण पाहणार आहोत.
अर्चना याचा विवाह त्या 9 वर्षाच्या असताना झाला. 7 वी पर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सासरी आल्या. सासरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांच्याकडे थोडीफार शेती होती ती पण कोरडवाहू. त्यामुळे नवरा देखील रोजंदारी करायचा. पण अर्चना यांना काहीतरी करायचे होते फक्त गरज होती मार्गदर्शनाची. 1998 साली स्वयंम शिक्षणच्या काही कार्यकर्त्या त्यांच्या देवशींगा या गावामध्ये आल्या होत्या व त्यांच्या माध्यमातून बचत गट चालू करायचे त्यांनी ठरवले पण या गावातील महिलांना कधी उंबरा देखील ओलांडायची परवानगी नव्हती. अथक प्रयत्न करून साधारण दिड महिन्यानंतर त्यांनी बचत गटाची स्थापन केली. पण बचत गटामार्फत महिला फक्त शेती व दवाखान्यांसाठीच कर्ज घेत होत्या. म्हणून महिलांसाठी काहीतरी करायचे या हेतूने गावात सेंन्द्रिय शेतीचे गट तयार करण्याचे ठरले. हे काम त्यांच्यासाठी खूप अवघड होते. करण गावात सर्वांचा असा समज होता की रासायनिक खत टाकल्याशिवाय पीक येऊच शकत नाही. सेंद्रिय शेतीविषयी ज्यावेळी त्यांनी घरी सांगितले त्यावेळी त्यांना वेड्यात काढण्यात आले. अशी शेती शक्यच नाही म्हणून सर्वांनी त्यांची टिंगल केली. पण काय करणार घरच्यांनी जमीनच दिली नाही तर काहीच करता येणार नव्हते. पण अर्चना यांची जिद्द व अथक प्रयत्न यातून त्यांनी सुरवातीला एक गुंठा जमीन घेतली व त्यानंतर खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीला सुरवात झाली.
अर्चना सांगतात, सुरवात झाली त्यावेळी लोक म्हणत होते उगाच महिला उठतात आणि काहीही करतात. पण त्यांच्या या मानसिकतेत फरक पडत जाईल हे मनात ठेवून आम्ही काम करायला सुरू केले. सुरवातीला घरात पुरेल इतकाच भाजीपाला पिकवला त्यानंतर त्यातून चांगल्या प्रकारे ऊत्पन्न होऊ शकते हे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे घरी समजून सांगितले व त्यानंतर एका वर्षानंतर एक एकर जमीन दिली. हा माझा खूप मोठा विजय होता. ही जमीन मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागले हे शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे असल्याचं त्या सांगतात.
खऱ्या अर्थाने आता अर्चना यांना स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली होती. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीचे एक एकरात मॉडेल तयार केले. त्यात भाजीपाला, ज्वारी, गहू, कडधान्य त्याच बरोबर रब्बी व खरीप या दोन पेरण्या एकत्र कशा घेता येतील याचे बारीक नियोजन केले. हळूहळू त्यांनी गांडूळ खताचे दोन बेड सुद्धा तयार केले. गांडुखतामुळे बाकीच्या लोकांपेक्षा उत्पन्न देखील वाढले. यातून चांगले पैसे मिळू लागले. हे ज्यावेळी गावातील लोकांना लक्ष्यात आले त्यानंतर लोक येऊ लागले खताशिवाय हे श्याक्याच नाही. तुम्ही कोणती खते वापरता विचारू लागले. पण ज्यावेळी त्यांना समजलं की शेण, पालापाचोळा यापासून बनवलेल्या गांडूळ खतामुळे इतकं उत्पन्न मिळू शकत या नंतर मात्र सेंन्द्रिय शेती ही एक चळवळ झाली. लोक स्वतः आले व विकत घेवून गांडूळखत बनवण्यासाठी बेड बनवले. आता मात्र लोकांची मानसिकता बदलत चालली होती. कमी खर्चात जास्त व चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळू शकते हे त्यांना समजले होते. अर्चना सांगतात रासायनिक खत न वापरता फक्त सेंद्रिय शेती केली तर जमिनीचे नुकसान तर थांबतेच पण ते आपल्या आरोग्यास देखील ते सात्विक आहे. त्याच बरोबर रासायनिक खतांचा होणार खर्च वाचून जवळपास एकरी 50 हजार रुपयांची बचत होत. लोकांना सावकराकडून कर्ज घ्यावे लागायचे. हप्ते भरताना नाकेनऊ व्हायचे. आज लोक समाधानाने जगत आहेत. त्यामुळे योग्य प्रबोधन झाल्यामुळे आज गावातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करू लागले आहेत. मी सुद्धा आज पाच एकर जागेत अश्या प्रकारे सेंद्रिय शेती करत आहे.
इतकेच नाही तर अर्चना यांनी ऊस, सोयाबीन अशी नगदी पिके सुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेण्याचे आव्हान स्वीकारले असून त्यांनी आता चार एकर सोयाबीन सेंद्रिय पद्धतीने केले आहे. अश्या प्रकारे सर्वोतोपरी अशक्य वाटणारी गोष्ट अर्चना यांनी शक्य करून दाखवली आहे. एकेकाळी या महिलांना काय येते असे म्हणून हिनवणारे, त्यांची टिंगल करणारे लोक आज शेतात येतात व आम्हाला पण असे करायचे आहे. हे कसे करता येईल असे विचारतात. अथक परिश्रमातून हे परिवर्तन घडून आल्याचे अर्चना सांगतात.
आता पिकवकेला माल विकायचा कसा?
इथपर्यंत सर्व ठीक होते पण आता पिकवलेला माल बाजारपेठेपर्यंत पोचवायचा कसा? तो कोणत्या बाजारपेठेत घेऊन जायचा? यासाठी अर्चना भोसले यांनी स्वतःची विजयालक्ष्मी प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत 150 सभासद असून माल घेणे, त्याचे पॅकिंग करणे, त्याची विक्री करण्याने ही कामे देखील त्या आता करत आहेत. शेतकरी म्हंटल की सर्वांना फक्त पुरुष डोळ्यापुढे येतात. हे कष्टाचे काम आहे आणि ते महिलांना जमणार नाही असा जो काही समाजात समाजात होता. तो अर्चना भोसले यांनी मोडून काढला आहे.