डॉक्टरांनी रुग्णांना तर रुग्णांनी डॉक्टरांना राख्या बांधून साजरी केली राखी पौर्णिमा
राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून देण्यात आले 'मास्क' आणि घेण्यात आले कोविड प्रतिबंधात्मक बाबींच्या पालनाचे 'प्राॅमिस';
कोरोना झाल्याने दवाखान्यात असलेल्या रुग्णांना राखी पौर्णिमेला आपल्या नातेवाईकांना भेटणे शक्य नव्हते. त्यामुळे कोरोना बाधित रुगणांना देखील राखी पौर्णिमेचा सण साजरा करता यावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुलुंड परिसरात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयात रुग्णालयात राखी पौर्णिमेचा सण आवश्यक ती काळजी घेतसाजरा करण्यात आला.
या वेळी परिचारिका व डॉक्टर महिलांनी उपचारासाठी दाखल असलेल्या भावांना तर कोविड बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून आजचा राखी पौर्णिमेचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून भावांनी आपल्या बहिणींना 'मास्क'ची भेट देत घरातील सर्वांना योग्य प्रकारे मास्कचा वापर करण्याचे व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे 'प्राॅमिस' घेतले आहे, अशी माहिती या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली आहे.
'कोविड' बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी आपल्या महानगरपालिकेने उपचार केंद्रे व रुग्णालये सुरू केली आहेत. यापैकीच एक जम्बो उपचार रुग्णालय हे मुलुंड परिसरातील 'रिचर्डसन आणि कृडास' या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेच्या जागेवर १५ जुलै २०२० पासून कार्यरत आहे. आजवर या रुग्णालयाद्वारे तब्बल १३ हजारांपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत.
या रुग्णालयात सध्या ३०८ खाटा कार्यारत असून यापैकी ५८ खाटा या 'अतिदक्षता खाटा' (ICU Bed) आहेत. याच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण बांधवांना आज राखी बांधून येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी राखी पौर्णिमा साजरी केली. तर रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णांनी देखील रुग्णालयातील आपल्या डॉ. भावांना राखी बांधून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजचा राखी पौर्णिमेचा सण साजरा केला आहे.