शिवभोजन थाळीची ऐशी तैशी, शौचालयात धुतली जातायत भांडी
शौचालयात खरकटी भांडी धुण्याचा किळसवाणा प्रकार शिवभोजन थाळी केंद्रात घडला आहे.
ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्यानंतर ते उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. अनेकांना या योजनेचा फायदा झाला आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातील एक भयाण वास्तव समोर आलंय. या केंद्रात ग्राहकांना ज्या थाळीत जेवण दिलं जातं. ती थाळी जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल व्हिडिओमुळे समोर आला आहे. या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र सुरेखा दादाराव नरवाडे या महिलेचं असल्याची माहिती समोर आली आहे. सुरेखा दादाराव नरवाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतू त्यांचा फोन स्विच ऑफ लागला. आमच्या प्रतिनिधीने त्या केंद्रावर जाऊन बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतू त्या ठिकाणी कुणीही उपस्थित नव्हतं.
यामुळे सरकारच्या हेतूला हरताळ फासल्याचा प्रकार घटत आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन दिलं जात असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जातेय. स्थानिकांनी तर या केंद्रावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या शिवभोजन थाळी केंद्राच्या चालकावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.