गावातील दारूबंदीसाठी अनेक प्रयत्न करूनही काहीच होत नसल्याने 'सरपंचपती'ने केलं असं काही की...
बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील ईसरूळ येथे देशी दारूचे बॉक्स विक्रीसाठी पोहोचविणाऱ्या दारू विक्रेत्याला गावाच्या स्मशानभूमी जवळच अडवुन ईसरूळ येथील सरपंचपती तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष भुतेकर यांनी चांगलाच चोप दिला एवढेच नव्हे तर, सर्व दारूचे बॉक्स फोडून जाळून टाकून पुन्हा गावाकडे दारू घेऊन आलास तर याद राखा असा दम भरला. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, आणि विविध गावातून भुतेकर यांचे अभिनंदन आणि समर्थन केले जात आहे.
ईसरूळ गावात चार अवैध दारुची विक्री करणारे दुकाने आहेत. या चारही दुकानदारांच्या गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या.त्यामुळे त्यांचे अनेकदा वाद देखील झालेत. तरीदेखील पोलीस प्रशासन दारू विक्रेत्यांवर कारवाई करतांना दिसत नाही. अनेक वेळा गावात घरपोच दारू पाठविणारे देऊळगावराजा येथील दारू विक्रेत्यांची माणसे पकडून ग्रामपंचायत मध्ये कोंडून ठेवली, त्यांना समज दिला तरीही काहीच फरक पडला नाही.
अनेक प्रयत्नं करूनही दारुचे बॉक्स पोहोचविण्याचे काम अविरत सुरूच आहे. त्यामुळे आम्ही आता हा मार्ग अवलंबला असल्याचे संतोष भुतेकर यांनी म्हटले आहे. या सर्व अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी पायबंद घालावा, आणि ईसरूळ गावातच नव्हे तर पंचक्रोशीतील अवैध दारू विक्री बंद करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन पोलिसांचे काम करावे लागेल असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची आणि सरपंचपतीची ही युक्ती कौतुकास्पद म्हणावं लागेल.