कोरोना नंतर आता राज्यातील शालेय जीवन हे पुर्वपदावर आलं आहे. आणि त्यासोबत निगडीत असलेले अनेक प्रश्न सुध्दा.... शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान्ह भोजन दिलं जातं. ते भोजन तयार करणारे आणि वितरीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अगदी तुटपुंजा पगार दिला जातोय. ही पगारवाढ व्हावी यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करणारे शालेय पोषण आहार कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय तूटपुंज्या मानधनावर काम करत आहेत, आताच्या महागाई च्या तुलनेत केवळ दीड हजार रुपये मानधनावर महिन्याभराचा उदरनिर्वाह करावा तरी कसा..? असा प्रश्न या सर्व कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक दिली, आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. २६ हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात यावे.. सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावे. यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.