.. आणि सावित्रीची लेक अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्त झाली..
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधन या डोबावलीत एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम सुरू होता याचवेळी त्यांना उपस्थित असलेल्या महिलांमध्ये एका महिलेच्या डोक्यात जटा झाल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी त्या महिलेचं प्रबोधन करत तिच्या केसातील जटा कापून टाकल्या...;
केसांच्या अस्वच्छतेमुळे डोक्यामध्ये तयार होणारी जटा आणि मग त्याला देवीचा प्रकोप हे नाव देऊन त्या महिलेचं समाजातर्फे होणारे शोषण ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा ...! शोषणाच्या या कुप्रथेला छेद देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव ह्या गेली कित्येक वर्षे करीत आलेल्या आहेत .डोक्यात जटा आलेल्या महिलेची माहिती मिळवणे तिचे प्रबोधन करून तिला योग्य मार्गदर्शन करून , तिच्या घरच्या लोकांचा विरोध असेल तर त्यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांना समजावून सांगूण त्या पीडितेला जटा मुक्त करणे करणे हा नंदिनीताई चा जीवनाचा जणू ध्यास झालेला आहे.
काल 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. जिच्या अथक प्रयत्नांमुळे या समाजातील स्त्रिया शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची कास धरू शकल्या, लिहिता-वाचता येऊ लागल्या, अन्यायाविरुद्ध बोलू लागल्या तिचा जन्मदिवस...! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखेच्या वतीने आयोजित सावित्री पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने डोंबिवली येथील प्रा प्रवीण देशमुख यांच्या घरी कार्यक्रम सुरू असताना काही ध्यानीमनी नसताना उपस्थितांमध्ये एका सफाई काम करणाऱ्या महिलेच्या डोक्यात जटा आहे हे समजताच नंदिनीताई मधील संवेदनशील कार्यकर्ता जागा झाला. नंदिनी ताईंनी लगेच त्या महिलेचे योग्य प्रबोधन केले.
जटा कशामुळे निर्माण होते त्याची कारणमीमांसा तिला व तिच्या मालकिणीला समजून सांगितली. घरच्यांचा विरोध असेल तर त्याची काळजी करायचं कारण नाही आम्ही त्यांना समजून सांगू याची शाश्वती दिली . डोक्यात निर्माण होणारी जटा देवीचा प्रकोप किंवा कुठल्याही अल्ला, गोॅड यांच्या खप्पा मर्जी मुळे तयार होत नसून ती अस्वच्छतेमुळे तयार होते, केसांची निगा नीट न राखल्याने तयार होते, हे तिला व तिच्या मालकिणीला समजावून सांगितले. आणि मग सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव निमित्त आयोजित सावित्री पहाट या कार्यक्रमाच्या ठिकाणी जटा निर्मूलन होवून खऱ्या अर्थाने एका सावित्रीच्या लेकी ने दुसऱ्या सावित्रीच्या लेकीची अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्तता केली व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी पुरोगामी विचारांचे अनुकरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
हे त्यांचे चे 228 वे जटा निर्मूलन होते...!
नलिनीताईच्या आयुष्यात आजचा पूर्ण दिवस बहुदा जटा निर्मूलनाचाच होता .कारण ३ वर्षांपूर्वी एका रिक्षाचालकाने नंदिनीताई जाधव यांचा वृत्तपत्रामध्ये आलेला मोबाईल नंबर नोंद करून ठेवलेला होता . त्याच्या या सजगतेचा खऱ्या अर्थाने आज उपयोग झाला. कळवा येथील खारेगाव भागात एका मोडकळीस आलेल्या चाळीत राहणाऱ्या तरुणीच्या डोक्यात जटा तयार झाली होती. या जटे मुळे तिच्या डोक्यामध्ये प्रचंड जखमा झालेल्या होत्या. तिला जगणे मुश्कील झाले होते . तिला रात्र रात्र झोप लागत नव्हती. त्या महिलेच्या आईला या रिक्शावालाने नंबर दिला आणि मग नंदिनी ताईशी संपर्क झाला.
नंदिनीताई त्या महिलेच्या विनंतीवरून आज पुण्यावरून निघाल्या होत्या, त्यातच प्रा प्रवीण देशमुख यांचे कडील सावित्री पहाट या कार्यक्रमा बाबत समजतात त्या सावित्रीबाईंना वंदन करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाला आल्या होत्या. हा कार्यक्रम आटपून कळव्याला जाऊन जटा निर्मूलन करणार होत्या. पण आज एक नव्हे तर दोन सावित्रीच्या लेकींना त्यांनी जटा मुक्त केले व खऱ्या अर्थाने सावित्री जयंती साजरी केली.
खरोखर जर समाजामध्ये या ऑटो रिक्षावाल्या सारखी सजगता, जागरुकता किंवा आपल्या घरी घरकाम करणाऱ्या महिलांचे सुखदुःख जाणून घेण्याची संवेदनशीलता प्रत्येकाने जोपासली तर हा समाज सुदृढ व निरोगी राहू शकतो , अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडू शकतो हेच ऑटोरिक्षा वाल्याच्या सजगते वरून आणि नंदिनीताई सारख्या कार्यकर्त्यांच्या संवेदनशीलते वरून सिद्ध होतं, हे याठिकाणी आवर्जून नमूद करावं वाटतं. आजच्या जटा निर्मूलनाच्या डोंबिवली आणि कळवा येथील दोन्ही कार्यक्रमाला नंदिनी जाधव यांच्या समवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र चे ट्रस्टी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश चिंचोले व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.