'फेअर एन्ड लव्हली' चं 'ग्लो एन्ड लव्हली' झाल्यानंतर आता महिलांची प्रतारणा करणाऱ्या मिंत्रानेही त्यांचा लोगो बदलला. गेल्या काही दिवसांपूर्वी ४५ वर्षांपासून फेयरनेस क्रिम विकणाऱ्या 'फेअर एन्ड लव्हली' या कंपनीने जगभरात वर्ण द्वेशामुळे सुरू असलेल्या घटना लक्षात घेऊन आपलं नाव बदलून 'ग्लो एन्ड लव्हली' केलं. कोणतही प्रोडक्ट बाजारात विकताना कोणाची प्रतारणा होऊ नये असा या मागचा हेतू असायला हवा. मात्र ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या डोळ्यासमोर असलेल्या मिंत्रा (Myntra) या कंपनीच्या लोगोमध्ये खूप मोठी चूक होती. कंपनीच्या लोगोमध्ये अप्रत्यक्ष रित्या महिलेच्या गुप्तांगाचं प्रतिक दिसत होतं. कंपनीने कार्यभार सुरू केल्यापासून त्यांचा हा लोगो तसाच होता.
लोकांच्या नजरेत सजह न येणारा, पण महिलांची प्रतारणा करणारा हा लोगो बदलण्यासाठी अनेकांनी कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र कंपनीने हा लोगो बदललाच नाही. शेवटी सायबर गुन्हे शाखेच्या मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी मिंत्रा कंपनीला अधिकृत नोटीस पाठवली. नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे धाबे दणाणले असून कंपनी मुंबई पोलीसांसमोर नरमली आहे. कंपनीने सायबर गुन्हे शाखेच्या मुंबई पोलीस आयुक्त श्रीमती एस. एस. सहस्त्रबुद्धे यांना एक पत्र लिहून लवकरच संपूर्ण देशात मिंत्राचा लोगो जिथे जिथे वापरला जातो, त्या त्या ठिकाणी लोगो बदलणार असल्याचं सांगितलं आहे.
महिलांच्या विषयी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या आक्षेपार्ह, मजकूर, चित्रफीत, छायचित्र आणि डिझाईन प्रसिद्ध करणे गुन्हाच आहे. मिंत्राला ही चूक लक्षात आणून देत, सायबर गुन्हे शाखेच्या मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी ती सुधरायला भाग पाडलं. कंपनीचा सुधारीत लोगो लवकरच कंपनीच्या वेबसाईट, बॅनर, पार्सल्स आणि पॅकींगवर दिसणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.