'लडकी हूँ, लड सकती हूँ' म्हणत मुंबई काँग्रेस आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत महिला मोठ्या संख्येने सहभागी
‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ हा नारा देत मुंबई काँग्रेसच्या वतीने मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात महिलांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेत विजेत्या महिलांना स्कूटर दिली जाणार आहे.;
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 'लडकी हूँ, लड सकती हूँ' हा नारा देत राजकारणात महिलांचा सहभाग वाढवा यासाठी मोहीम हाती घेतली आहे. उत्तर प्रदेश मध्ये चालू असलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी ही घोषणा केली असली तरी ती आता देशव्यापी झाली असल्याचे दिसत आहे. अनेक राज्यात आता 'लडकी हूँ, लड सकती हूँ' या घोषणेनंतर महिलांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. हाच नारा देत काँग्रेसतर्फे आता विविध राज्यात महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. याचं धर्तीवर आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात महिलांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या आहेत. 'लडकी हूँ, लड सकती हूँ' असे टीशर्ट घालून महिला या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिला या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
उत्तर प्रदेश इलेक्शन साठी प्रियंका गांधी यांनी महिलांसाठी खास घोषणापत्र सुद्धा तयार केला आहे. यामध्ये महिलांच्या दृष्टीने अनेक गोष्टींचा सहभाग आहे त्यामध्ये महिलांना स्मार्टफोन आणि स्कूटर देण्याची सुद्धा घोषणा केली आहे. मुलींनी स्वावलंबी व्हावं हा यापाठीमागचा त्यांचा हेतू आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धातील विजेत्या महिलांना देखील स्कूटर दिली जाणार आहे.