काँग्रेसचे आमदार नाराज ही माध्यमांनी उठवलेली अफवा, ॲड. यशोमती ठाकूर यांचे स्पष्टीकरण
मंत्री यशोमती ठाकूर यांनी महागाईच्या विरोधात अमरावतीमध्ये काँग्रेसची संविधानाची गुढी उभारली.
पाच राज्यातील निवडणुका संपताच देशात अपेक्षेप्रमाणे महागाईचा विस्फोट झाला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून निवडणुकीचा हंगाम वगळता सातत्याने महागाई वाढत चालली आहे. या महागाईच्या विरोधात लोकशाहीचे रक्षण करणारी गुढी काँग्रेस समितीच्या वतीने अमरावतीत उभारल्याची प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अमरावती जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने आज गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त अमरावतीत समतेची गुढी उभारण्यात आली आहे. या सोहळ्यानंतर त्या बोलत होत्या.
लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही सातत्याने काम करीत असून सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आम्ही लोकशाही आणि संविधान जपण्याचा नक्की प्रयत्न करू, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.
तसेच गुढी पाडव्याच्या निमित्ताने ॲड. ठाकूर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने आज गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मराठमोळा झिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
काँग्रेसचे आमदार नाराज नाहीत
काँग्रेसचे पंचवीस आमदार नाराज असल्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असून, ही केवळ प्रसारमाध्यमांमध्ये उठवली गेलेली अफवा असल्याचे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसचे कोणतेही आमदार नाराज नाहीत आणि कोणत्याही पद्धतीची धुसफूस पक्षात नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.