राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर राज्यातील महाविद्यालय कधी सुरू होणार याकडे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालय सुरू होणार हे कळताच अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. कारण मागील दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण प्रणाली मार्फत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानंतर आता इतक्या दिवसानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र अजूनही महाविद्यालय सुरु का केली जात नाहीत? असा प्रश्न प्राध्यापक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा सूर देखील उमटत होता. या सगळ्याचा विचार करून काल झालेल्या कोरोना आढावा बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर पासून सुरु होणार असल्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.