मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

Update: 2021-07-20 02:44 GMT

पंढरपूर – कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांना विठ्ठलाची वारी करता आलेले नाही, त्यामुळे कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाला घातले आहे. #आषाढीएकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते.

पंढरपुरात पुन्हा भक्तीसागर जमू दे, वारकऱ्यांची पायी वारी पुन्हा एकदा होऊ दे.... असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यानिमित्त विठ्ठलाला घातले. यावेळी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी मानाचे वारकरी ठरलेल्या केशव कोलते आणि आणि त्यांच्या पत्नीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून एस.टी. महामंडळाचा एक वर्षाचा मोफत पासही यावेळी देण्यात आला. यावेळी राज्य सरकारतर्फे यात्रेच्या अनुदानाचा पाच कोटी रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांना देण्यात आला.

आषाढीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, असेही मुख्यमं6 यावेळी म्हणाले. सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी दुहेरी पाईपलाईनकरीता आणखी १०३ कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यावर सोलापूरच्या पाण्याचा विषय मार्गी लावण्यासह पोलीस विभागाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Tags:    

Similar News