पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांची भूमिका संदिग्ध, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप!
गेल्या १२ दिवसांपासून टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं प्रकरण चर्चेत आहे. पूजा हिने आत्महत्या केली नसून तिचा खून करून त्याला आत्महत्येचं स्वरूप देण्यात आल्याचा आरोप पूजा चव्हाण हिच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला आहे. शांताबाई यांच्या म्हणण्यानुसार पुजाचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संबंध होते.
पूजा ही संजय राठोड यांच्याकडून गर्भवती ही राहिली होती, तसेच हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी संजय राठोड यांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं असाही आरोप शांताबाईंनी केला आङे. पूजाचा गर्भपात झाल्यानंतर तिला यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा गंभीर दावाही शांताबाई राठोड यांनी केला होता. अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
याच प्रकरणी आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे कॉल रेकॉर्डिंग, फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत असताना देखील पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना चौकशीला का बोलावले नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्याच बरोबर जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही, तो पर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
संजय राठोड यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशी व्हावी या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.