मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आली. या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना चार मे रोजी घडली असून या मध्ये दोन महिलांची धिंड काढली जात आहे. यावेळी या जमावाने यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार देखील केला असल्याचं म्हंटलं जात आहे. हे सगळं घडत असताना या महिलेचा भाऊ मध्ये आला म्हणून त्या भावाची देखील हत्या करण्यात आली आहे. आता या घटनेची सुप्रीम कोर्टाने सुद्धा दाखल घेतली आहे..
सुप्रीम कोर्टाने मणिपूरच्या घटनेचा निषेध केला असून, हे फार विचलित करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसंच हे फार मोठं घटनात्मक अपयश असल्याची टीका केली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 28 जुलैला सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.