कास्टींग काऊचंच रॅकेट: तिघांना अटक, आठ मॉडेल्सची सुटका!
मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या एका माहितीच्या आधारावर मुंबईच्या जुहू परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून ३ लोकांना अटक केली आहे.;
मुंबईच्या जुहू परिसरातील एका हॉटेल मध्ये चित्रपटाच्या ऑडिशनच्या बहाण्याने कास्टींग काऊचचा प्रकार सुरू होता. मुंबई पोलीसांनी इंडियन एक्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीसांनी अटक केलेला कास्टींग एजंट आणि छोटा निर्माता संदीप इंगळे (३८) हा मुंबईत चित्रपट, मालिकांमध्ये काम करायला आलेल्या मॉडेल्सना आपल्या जाळ्यात ओढायचा.
मॉडेल्सना चित्रपट मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांचे फोटोग्राफ्स मोठ्या लोकांना पाठवून हा नराधम त्यांचा सौदा करायचा. या मोठ्या लोकांसोबत वन नाईट स्टॅंड केल्यानंतर तुम्हाला काम मिळेल असं म्हणत तो या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत होता. आणि विशेष म्हणजे त्याला या कृत्यात साथ देणाऱ्या दोन मॉडेल्सनाही मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्या दोघींची नावं तान्या शर्मा(३१) आणि हनुफा सरदार(२६) सांगण्यात आले आहे.
मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्या टीमने सापळा रचून या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या तीघांच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या ८ मॉडेल्सचीही सुटका या हॉटेलवरून करण्यात आली आहे. आरोपींच्या मोबाईलची तपासणी पोलीसांनी केल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवरून अनेक लोकांना मॉडेल्सचे फोटो पाठवून त्यांचा सौदा करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
सध्या हे तिन्ही आरोपी मुंबई पोलीसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून अजून किती मुलींची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या मुलींचा सौदा करून त्यांचा उपभोग घेणाऱ्या लोकांचाही मुंबई पोलीस शोध घेत आहेत.