उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदाराची पत्नी बेड न मिळाल्याने तीन तास जमीनीवर पडून
माझ्या पत्नीला जेवण, पाणी सुद्धा दिले जात नसल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे.;
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची परिस्थिती भयंकर झाली असून, सत्ताधारी पक्षातील भाजप आमदाराच्या पत्नीलाही बेड न मिळाल्यामुळे 3 तास जमिनीवर पडून राहावं लागल. एवढच नाही तर डॉक्टर आणि अधिकारी काहीच करत नसल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे.
उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना मतदारसंघाचे आमदार राम गोपाल उर्फ पप्पू लोधी यांना 30 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी संध्या लोधीही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या, सुरवातीला त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
आमदार लोधी यांना बरं वाटू लागल्याने त्यांना शनिवारी क्वारंटाइन सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. मात्र त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने त्यांना आग्र्यातील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती करण्यात आले. पण आमदार लोधी यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांच्या पत्नी संध्या यांना बेड न मिळाल्याने त्यांना 3 तास जमीनीवर झोपून राहावे लागले. त्यांनतर जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने बेड मिळाले.
आमदार लोधी यांच्या मते, अद्याप त्यांच्या पत्नीची प्रकृती कशी आहे हे त्यांना सांगितले जात नाहीये. लोधी यांनी केलेल्या आरोपानुसार एसएन मेडिकल कॉलेजमध्ये चांगले उपचार होत नाहीत. विचार करण्यासारखी बाब म्हणजे जेव्हा आमदाराच्या पत्नीला बेड न मिळाल्याने जमिनीवर झोपावे लागत असेल आणि तिच्यावर उपचार केले जात नसेल तर, मग सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
तसेच माझ्या पत्नीच्या तब्येतीबद्दल मला सांगितले जात नाहीये, तिला जेवण, पाणी सुद्धा दिले जात नाहीये असा आरोपही लोधी यांनी केला आहे. तर अधिकारी आणि डॉक्टर फक्त बघ्याची भूमिका घेत असून काहीच करत नसल्याचं सुद्धा आमदार लोधी म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वात वाईट स्थिती लखनौ, कानपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.