गानकोकीळा भारत रत्न लता मंगेशकराच्या निधनानंतरत केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने आज सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेने आजपासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक देखील एक दिवस पुढे ढकलली आहे. आज प्रमुख बँकांचे कामकाज महाराष्ट्रात बंद राहणार आहे.
रिझर्व्ह बँकेची द्वैवार्षिक पतधोरण बैठक सुरु मुंबईत होणार होती. मात्र महाराष्ट्र सरकारने आज सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबाबत रात्री उशीरा रिझर्व्ह बँकेकडून निवेदन जारी करण्यात आले. आता ८ ते १० फेब्रुवारी २०२२ या काळात पतधोरण समितीची बैठक होणार आहे.
दरम्यान, आज राज्यातील बहुतांश बँका, सहकारी बँका आणि वित्त संस्था सार्वजनिक सुट्टीमुळे बंद राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने यासंदर्भात एक निवदेन जाहीर केले असून त्यात बँकेच्या सर्व शाखा आज बंद राहतील, असे जाहीर केले आहे.
आज राज्यातील बँका बंद असल्याने तर महाराष्ट्र वगळता देशभरात बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. आज सोमवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार देखील नेहमीप्रमाणे सुरु राहतील.