मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये साप्ताहिक पुरवणी आणि अर्धा तास शो पलिकडे महिलांना स्पेस दिली जात नाही. मात्र तरीही महिला विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतच असतात. त्यामुळे अशाच गगनभरारी घेतलेल्या महिलांचा मॅक्स वूमन आयोजित आणि महाचहा प्रस्तूत मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कवयित्री आतिकी फारुखी, सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे यांनी आस्था फाऊंडेशनची स्थापना, त्यात आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात हा सविस्तर प्रवास सांगितला. त्याबरोबरच सामाजिक कार्याचा वसा बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्याकडून पुढे नेत असल्याचेही आरती आमटे यांनी सांगितले.
शृंखला पायी असू दे, हा बाबा आमटे यांचा मंत्र डोक्यात ठेऊन आपण वाटचाल करत आहोत. कारण आजोबा बाबा आमटे, वडील प्रकाश आमटे आणि आई मंदाकिनी आमटे यांनी आम्हाला मुलगा-मुलगी भेदभाव न करता वाढवलं. त्याबरोबरच आमचं बालपण हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात गेलं. त्यातूनच सामाजिक कार्याची आवड वाढत गेल्याचं आरती आमटे यांनी सांगितलं. त्यामुळे या सामाजिक कार्याचा प्रवास नागपूरच्या नर्सिंग कॉलेज, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मार्गे अमरावतीमध्ये गरजू आणि निराधार व्यक्तींसाठी उभ्या केलेल्या आस्था प्रकल्पापर्यंत पोहचला. यावेळी आरती आमटे यांनी आस्था प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती दिली.
त्यानंतर या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपला प्रवास कथन केला. आदिती तटकरे यांना घरातूनच राजकीय वारसा होता. त्यामुळे राजकारणात प्रवेश करताना आदिती तटकरे यांच्यासमोर दोन आव्हानं होती, असं आदिती तटकरे सांगतात. त्यातील पहिलं आव्हान हे राजकारणात पडायचं की नाही हे तर दुसरं घराणेशाहीचा लागलेला टॅग कसा मिटवायचा? हे दुसरं आव्हान होतं. मात्र या दोन्ही आव्हानांवर मात करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं आदिती तटकरे सांगतात.
यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, मी राजकारणात येण्याविषयी काहीही ठरवलं नव्हतं. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राज्यशास्त्र आणि इतिहास हे विषय घेतले होते. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात फेलो प्रोफेसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर राजकारणात येईल, असं वाटलं नव्हतं. मात्र 2009 मध्ये सुनिल तटकरे यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यात पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यांची जबाबदारी वडिलांनी माझ्यावर दिली. ती माझी राजकारणातील एन्ट्री. त्यावेळी मी पूर्ण क्षमतेने काम करून स्वतःला सिध्द केलं. यानंतर 2017 मध्ये वडिलांनी मला जिल्हा परिषद लढवण्याची संधी दिली आणि मी त्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर पक्षानेही मला जिल्हा परिषदेची तरुण अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर 2019 च्या निवडणूकीत मला विधानसभेची संधी आणि त्यानंतर मंत्रीमंडळात काम करण्याचीही संधी दिली. मात्र या काळात राजकारणात लोकांशी कनेक्ट कधीही तुटता कामा नये, हा मंत्र मी लक्षात ठेवला. त्यामुळेच कोकणात निसर्ग, तौक्ते आणि त्यानंतर महापुराचं संकट आल्यानंतरही आम्ही लोकांना मदत देऊ शकलो, असं आदिती तटकरे सांगतात.
पुढे आदिती तटकरे म्हणाल्या की, राजकारणात नाटक आणि सिनेमापेक्षाही जास्त नाटक करावी लागतात. त्यामुळे राजकारण हे क्षेत्र खूपच आव्हानात्मक आहे. म्हणून या क्षेत्रात राजकीय वारसा असो वा नसो. पूर्ण क्षमतेने महिलांनी राजकारणात सक्रीय राहिल्यास आणि स्वतःला सिध्द केल्यास राजकारणात टिकाव धरु शकतो. याबरोबरच आरक्षण नसताना विधानसभेत 50 टक्के महिलांची संख्या असावी, अशी इच्छा आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मी लहानपणी खूप लाजाळू आणि बुजऱ्या स्वभावाची होते. पण मला परिस्थितीने आक्रमक बनवलं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या घरात माझा जन्म झाला. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर पुढे काय होईल? या भीतीने मोठ्या बहिणीचं निधन झालं. मात्र अशा दुःखद प्रसंगी कुणीही सोबत आलं नाही. त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढायचा आहे, हे स्वतःला सांगितलं. त्यावेळी एकीकडे हे सगळं दुःख पचवत बीडमधील राजकीय व्यक्तीने राष्ट्रीय पातळीवर माझी निवड झालेली असतानाही माझं नाव त्या यादीतून खोडलं. हा आणखी एक धक्का माझ्यासाठी होता. त्यावेळी आपल्यासाठी कुणीच उभा राहणारं नाही. मात्र दुसऱ्यांसाठी कुणीतरी असायला हवं. नाहीतर असा अन्याय होत राहील, याच भावनेतून रुपाली ठोंबरे यांनी आक्रमकपणा स्वीकारला.
पुढे 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर खळखट्याक आंदोलन केलं. त्यावेळी घरात सगळे वकील असताना तीन महिने फरार व्हावं लागलं. तसेच या फरार असलेल्या काळात रुपाली ठोंबरे नेमक्या कशा राहिल्या? याविषयी त्यांनी माहिती दिली. पुढे तीन महिन्यानंतर जामीन न मिळाल्याने अखेर रुपाली ठोंबरे पोलिसांत हजर झाल्या. त्यानंतर त्यांना काही दिवस तुरुंगात रहावं लागलं. मात्र बाहेर आल्यानंतर लोकांनी दिलेलं प्रेम पाहून रुपाली ठोंबरे यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यातूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. त्यांनी पुणे महापालिका निवडणूक लढवली. त्यात आधी पराभव, त्यानंतर विजय मिळाल्याने लोकांची कामं करता आली, असं रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी राजकारणात येण्याचा नवा फॉर्म्युला सांगितला. यामध्ये रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, राजकारणात यायचं असेल तर महिलेने दबंग असलं पाहिजे. आपण स्वतःची सुरक्षा करण्यासाठी तयार असलं पाहिजे, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या. याबरोबरच राजकीय आणि सामाजिक आयुष्याबरोबरच कौटूंबिक आयुष्यातील अनेक किस्से रुपाली ठोंबरे यांनी सांगितले. तसेच 2024 च्या विधानसभेत मला काम करायचं आहे, असं थेटपणे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
यानंतर बोलताना कवयित्री आतिकी अहमद फारुखी यांनी आपला जीवनप्रवास सांगितला. त्यातच 2003 मध्ये प्रथम मुंबईत आल्यानंतर मुंबई कशी वाटली? याविषयी आतिकी फारुखी यांनी मराठीत भावना मांडल्या. त्याबरोबरच मेरठ कॅन्टोन्मेंट ते देशातील 10 शहरांचा प्रवास करून मुंबईत स्थायिक होण्याचा वेगळा अनुभव आतिकी फारुखी यांनी सांगितला. मुंबई ही सर्वधर्मसमभाव असलेलं शहर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रांतातील लोकांना सहज समावून घेतलं जातं. असं मत आतिकी फारुखी यांनी व्यक्त केलं.
आतिकी फारुखी यांनी वयाच्या 23 व्या वर्षी मुंबईत घर घेतलं. एक पत्रकार, कवयित्री म्हणून प्रसिध्दी मिळत असली तरी या सगळ्या यशाच्या मागे माझे वडील असल्याचंही आतिकी यांनी आवर्जून सांगितलं. यावेळी आतिकी फारुखी म्हणाल्या, आयुष्यात कधीही उमेद सोडू नये. नाऊमेद होऊ नये. एखादी गोष्ट मिळाली नाही तर पुन्हा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे प्रत्येकाने आपला एक डोळा वर्तमानावर तर एक भविष्यावर ठेऊन वाटचाल करायला हवी, असं आतिकी फारुखी म्हणाल्या.
यानंतर ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी आपला राजकीय पत्रकारितेचा प्रवास सांगितला. यावेळी राही भिडे म्हणाल्या की, या भगवान गौतम बुध्दांनी पहिल्यांदा स्त्री पुरुष समानतेचा धडा घालून दिला. त्यांनी भिख्खू संघाबरोबरच भिख्खूनी संघ स्थापन केला. हा परिवर्तनवादी निर्णय होता. या निर्णयाला तेव्हा प्रचंड विरोध झाला. मात्र तरीही भगवान बुध्द आपल्या विचारावर कायम राहिले.
पुढे बोलताना राही भिडे म्हणाल्या, मी 32 वर्षे राजकीय पत्रकारिता करीत आहे. या प्रवासात अनेक अनुभव आले. मात्र या सगळ्याचं मूळ बालपणी शाळेत बातम्या वाचून दाखवण्यात असल्याचंही राही भिडे सांगतात. त्याबरोबरच महिलांनी पत्रकारितेतही दबंगगिरी करत राजकीय पत्रकारितेत यायला हवं, असं मत राही भिडे यांनी व्यक्त केले.
राही भिडे यांनी Clarity मधून लिहीण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी युथ कॉलम आणि पुढे राजकीय घडामोडींचे वार्तांकन करायला सुरुवात केली. त्यातूनच राजकीय पत्रकारितेला सुरुवात झाली. या काळात शरद पवार यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक राजकारण्यांचे किस्से राही भिडे यांनी सांगितले. यावेळी राही भिडे म्हणाल्या, जर समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर प्रत्येकाने लिहीलं पाहिजे. जर आपण लिहीलं तरी समाजात परिवर्तन घडण्यास मदत होईल.
मॅक्स वूमन आयोजित आणि महा चहा प्रस्तूत कार्यक्रमात गगनभरारी घेतलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका सुलभा कोरे यांचा मॅक्स वूमन 2023 पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी महिलांना मदत केली तर महिलांना पुढे जाण्यासाठी कुणीच रोखू शकत नसल्याचे सुलभा कोरे यांनी सांगितले.
तसेच यावेळी पेनो इंडियाच्या विजया पवार यांनी हजारो महिलांना विणकाम आणि हस्तकलेकडे वळवलं. त्यातून रोजगार निर्माण करून दिला. त्याबद्दल मॅक्स वूमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विजया पवार यांनी सांगितले की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, असं म्हणत आपल्या यशात पतीचा मोठं सहकार्य लाभल्याचं सांगितलं.
या कार्यक्रमात स्वयंसिध्द महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे सह संपादक रवींद्र चव्हाण यांनी महिलांच्या सन्मानासाठी प्रायोजकत्व देणाऱ्या महाचहाचे आभार मानले. या कार्यक्रासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर, मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक आनंद गायकवाड, मॅक्स महाराष्ट्र हिंदीचे संपादक मनोज चंदेलिया उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शिनी हिंगे यांनी केले.