...म्हणून महिलांनी केली रस्त्यावरच भाताची लावणी
कसबेवणी येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक महिलांनी चिखलमय रस्त्यावर भाताची लावणी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नाशिक// कसबेवणी येथील देवी मंदिराकडे जाणा-या रस्ता चिखलमय झाल्याने परिसरातील महिला रहिवाश्यांनी रस्त्याच्या चिखलातच भाताची लावणी करत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो. वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने महिलांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले आहे.
कसबेवणी कॉलेज ते देवी मंदिराकडे जाणारा हा रस्ता असुन काही दिवासांपुर्वी या रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली होती. या रस्त्यालगत असलेले सर्व छोटे-मोठे अतिक्रमण संबधित प्रशासनाने काढले होते. मोठा व चांगला रस्ता होईल या आशेने रहिवाशांकडून देखील प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. मागील काही महिन्यांपुर्वी या रस्त्यावर दगड, खडी, टाकण्यात आली. तेंव्हा नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तरी देखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले.
मागील काही दिवसांपासून ठेकेदाराने या रस्त्याचे काम बंद केले. त्यामुळे खडी – दगड या रस्त्यावर तसेच पडून होते. अनेकदा ग्रामस्थांची ओरड झाल्यानंतर या ठिकाणी माती मिश्रीत मुरुम टाकुन देण्यात आला होता. पावसाळा सुरु होताच या माती मिश्रीत मुरुमाचा चिखल झाला. आणि या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करणं देखील अवघड झालं. याभागातील रहिवाशांकडून वारंवार ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्यात आला, परंतु काहीच फायदा झाला नाही. म्हणून संतप्त महिला नागरिकांनी या रस्त्यावरूल चिखलात भाताची लागण करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.