अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यात स्टेडियमवरच चाहते एकमेकांना भिडले..

Update: 2022-09-08 05:51 GMT

बुधवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही देशांचे चाहते स्टेडियममध्येच एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळाले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये चाहते एकमेकांवर खुर्च्या फेकताना आणि घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

अफगाणिस्तान-पाकिस्तानचे चाहते स्टँडमधील खुर्च्या उखडून आपापल्या देशांचे झेंडे फडकवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वृत्तानुसार, सामना गमावल्यानंतर अफगाण समर्थकांनी स्टेडियममध्ये काही पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली.

शेवटच्या षटकापर्यंत अफगाणिस्तान सुपर फोरचा सामना जिंकेल असे वाटत होते. पाकिस्तानची शेवटची विकेट होती आणि नसीम शाह स्ट्राईकवर होता. 6 चेंडूत 12 धावा हव्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत शानदार गोलंदाजी करणाऱ्या फजल्ला फारुकीच्या हातात चेंडू होता. पाकिस्तानचा पराभव निश्चित असल्याचे दिसत होते. पण, फारुकीने लागोपाठ 2 चेंडूंत पूर्ण सामना बदलून टाकला आणि नसीमने दोन्ही चेंडूंवर षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. यानंतर अचानक स्टेडियममध्ये हाणामारी सुरू झाली.

सामन्यादरम्यान पाकिस्तानी फलंदाज आसिफ आणि अफगाण गोलंदाज फरीद यांच्यात जोरदार वादावादीही झाली. १९ वी ओव्हर टाकायला आलेल्या फरीदच्या चौथ्या चेंडूवर आसिफने षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर फरीदने आसिफला झेलबाद केले. नॉन स्ट्रायकर एंडला जाणारा आसिफ आणि फॉलो-थ्रूला जाणारा फरीद यांच्यात टक्कर झाली. यानंतर दोघेही एकमेकांना काहीतरी म्हणाले आणि फरीदला मारण्यासाठी आसिफने बॅट उचलली. दोन्ही संघांच्या खेळाडूंना बचावासाठी यावे लागले.

Tags:    

Similar News