अहमदनगर जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी परिचारिका संघटनेने घेतली गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची भेट
अहमदनगर जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी दोन परिचारिका आणि एक परिचारक यांच्यावर शासनाने केलेले निलंबन आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून केलेली अटकेची कारवाई केली होती. दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे लावलेले कलम अन्यायकारक आणि त्यांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही कारवाई मागे घेण्यात यावी अशी विनंती परिचारिका, डॉक्टर्स आणि मेडिकल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुंबईत भेट घेऊन केली आहे.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे, जिल्हा परिषद परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव लता पाटील, डॉ. गंगोटे, डॉ.सायगावकर,डॉ.खेडकर,सचिन बैद,डीएन मेडिकल संघटनेचे राज्य अध्यक्ष, सचिव निलेश जाधव, सतीश शिंदे उपस्थित होते.
दरम्यान यावेळी संघटनेच्या अध्यक्षा आंधळे यांनी सांगितले की, मुळात आग विझवणे हे आपत्कालीन काम असून याचे प्रशिक्षण परिचारिका - डॉक्टर यांना नसते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी सोबतच आग लागण्यामागील तांत्रिक कारण असून त्यास वेगळ्या विभागाचे लोक जबाबदार आहेत. परिचरिकांचे काम हे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांनुसार रुग्णानांची सुषुश्रा करणे, काळजी घेणे हे आहे, यात जर काही कर्तव्य कसुरता असती तर झालेली कारवाई योग्य असती. मात्र, आगीच्या दुर्घटनेला परिचरिकांना का जबाबदार धरावे? अशा सवाल त्यांनी केला आहे.
सोबतच ज्यावेळी आग लागली त्यावेळी कर्तव्यावर असलेला कर्मचारीवर्ग जागेवरच होता असा दावा आंधळे यांनी केला. पोलिसांनी स्टाफ घटनास्थळी नव्हता असं म्हटलं आहे , सोबतच स्टाफ चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता अशी चर्चा होत आहे मात्र , जिल्हा रुग्णालय आवारातील कँटीन गेली अनेक वर्षे बंद आहे, त्यामुळे स्टाफ हा कँटीनला जाण्याचा प्रश्नच येत नाही. असं आंधळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शासनाने केलेली निलंबन,सेवा समाप्ती, पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचे लावलेले 304 कलम चुकीचे आहे. ही बाब गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसमोर मांडल्याचे आंधळे यांनी म्हटले आहे.