स्रियांना सैन्यात भरती करणाऱ्या अहिल्याबाई होळकर…

Update: 2022-05-31 07:57 GMT

ज्याच्या मनगटामध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा होऊ शकतो, असं सांगून आचरणात आणणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्ताने स्वकतृत्वाने 17 व्या शतकात एका महिलेने केलेला राज्यकारभार कसा प्रजाहित दक्ष होता. या संदर्भात प्रसिद्ध व्याख्याते अविनाश धायगुडे यांनी लिहिलेला लेख

जन्म आणि बालपण-

अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी पूर्वी बीड जिल्ह्यातल्या आणि आजचा नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला. माणकोजी शिंदे पाटील व सुशीलादेवी शिंदे यांच्या पोटी अहिल्या मातोश्रींचा जन्म झाला.

मातोश्रींना लहानपणापासूनच वाचण्याची, शास्त्रासोबतच शस्त्र शिकण्याची प्रचंड आवड होती. माणकोजी शिंदे गावचे पाटील असल्यामुळे अहिल्यामाई यांना लहानपणापासूनच हे सर्व काही करता आले.

विवाह -

अशाच एका प्रसंगांमध्ये मातोश्री घोड्यावर बसून शेताकडे फेरफटका मारत असताना काही वाटसरू त्या ठिकाणावरुन जात होते. ते वाटसरू दुसरे कोणी नसून साक्षात मराठा साम्राज्याचे सरदार मल्हाराव होळकर होते. मल्हाररावांनी त्या लहानशा मुलीकडे पाहून विचारलं आम्हाला प्यायला पाणी मिळेल का? तहान लागली आहे. मातोश्रींनी सांगितले की, आमच्याकडे पाणी पाजणे अगोदर वाटसरूंना, पाहुण्यांना जेवू घालणं हा आमचा धर्म आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला दोन घास खाऊन घ्यावे .

मातोश्री चा निडर स्वभाव मल्हाररावांना प्रचंड आवडला. त्यांनी मानकोजी यांच्या पुढे स्वतःचा मुलगा खंडेराव होळकर याच्या लग्नासाठीसाठी मागणी घातली.

व अहिल्यामाई यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. खंडेराव होळकर सुद्धा प्रचंड पराक्रमी, शूर, धाडसी व सर्वगुणसंपन्न होते. खंडेराव यांची साथ पुढे लाभल्यामुळे अहिल्यामाई यांचं कर्तृत्व पुढे आलं.

राज्यकारभाराची जबाबदारी

कुंभेरी च्या लढाईमध्ये रणवीर खंडेराव होळकर धारातीर्थी पडले. पुढील काही काळामध्ये सासरे मल्हारराव यांचे निधन झालं. मल्हारराव यांचे निधन झाल्यानंतर काही काळातच अगदी नऊ महिन्यांमध्ये मातोश्रींचा मुलगा मालेराव होळकर यांचे देखील निधन झालं. आता सर्व जबाबदारी ही मातोश्रींच्या खांद्यावर आली. मातोश्रींनी राज्यकारभार करत असताना व्यापक कार्य देशभरामध्ये केले. शिक्षण, शेती, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी होळकर साम्राज्याला उभारी दिली.

न्यायव्यवस्था -

"प्रजेच्या हितासाठीच राज्याची निर्मिती आहे. राजा आणि प्रजेचा संबंध म्हणजे आई पुत्राच्या संबंधाप्रमाणे असतो."

राज्यकारभार करत असताना मातोश्री त्यांच्या राज्यामध्ये न्यायव्यवस्थेला अतिशय महत्त्वाच्या स्थानी ठेवलं होतं. मातोश्रींचे एक वाक्य ठिकाणी नमूद करावंसं वाटतं मातोश्री म्हणतात की

"न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे होय. मातोश्री सांगतात की एखाद्या पीडितेला न्याय देण्यामध्ये जर विलंब झाला तर तो न्याय नाकारल्या समान असतो."

म्हणूनच गावातले तंटे भांडणं गावातच मिटली पाहिजेत. अशा प्रकारची रचना मातोश्रींनी त्यावेळेस निर्माण केली त्याला आज आपण तंटामुक्त गाव किंवा तंटामुक्त मोहीम अशा पद्धतीने ओळखतो.

लढाऊ बाणा-

मातोश्रींच्या बाबतीमध्ये अनेक समज-गैरसमज देशांमध्ये महाराष्ट्र मध्ये पसरवले आहेत जसे की मातोश्री या लढल्याच नाहीत. अशा प्रकारचे मतप्रवाह मांडले जातात.

परंतु चंद्रवंत त्यांच्यासोबत झालेली लढाई किंवा पेशव्यांच्या विरुद्धचे बंड हे नाकारता येत नाही. कारण राज्य चालवत असताना सगळ्याच गोष्टींचा अवलंब करावा लागत असतो. त्यामुळेच मातोश्री सांगतात की

"ज्याच्या मनगटात मध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा होऊ शकतो."

या वाक्यावरून मातोश्री या लढाऊ बाण्याच्या होत्या हे देखील आपल्या लक्षात येऊ शकते.

स्त्रियांना सैन्यात भरती करणारी व संधी देणाऱ्या मातोश्री...

आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्त्रियांच्या समानतेच्या चर्चा केल्या जातात. मातोश्रींचा सगळ्यात मोठा व्यापक दृष्टिकोन काय असेल तर त्यांनी ज्या स्त्रियांना संधी दिल्या आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा आणि लढण्याचा आत्मविश्वास दिला हे वाखाण्याजोगे आहे.

म्हणजे ज्या वेळेस राघोबा पेशवा मातोश्रींच्या वर आक्रमण करण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पाच हजार स्त्रिया यांना लढण्याची जबाबदारी मातोश्री दिली. हे इतिहासातलं सर्वात महत्त्वाचे उदाहरण आपण लक्षात घेतले पाहीजे.

पूर्वी विधवा स्त्रियांना मुलांना दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता. मात्र, मातोश्रींनी त्यांच्या राज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला तिच्या इच्छेप्रमाणे मुलाला दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला.

मातोश्रींनी हुंडाबळीच्या विरोधामध्ये प्रखरतेने पाऊल उचलून स्वतःच्या राज्य मधली हुंडाबंदी बंद करण्याचे काम त्यावेळेस केले.

जात धर्मापलीकडच्या पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या मातोश्री

महापुरुषांना कधीच जात नसते. त्याचप्रमाणे मातोश्रींनी जे काम केलं ते सुद्धा जात धर्म पंथ त्या पलीकडचे होते.

एक उदाहरण म्हणून ज्या वेळी 1990/92 च्या काळामध्ये बाबरी मज्जिद चा वादावरून देशामध्ये धार्मिक दंगल पेटली होती. सगळ्या देशांमध्ये हिंसाचाराचं वातावरण होते. परंतु याला अपवाद मात्र, मातोश्री यांचे इंदूर आणि महेश्वर होते. याबद्दल विचारले नंतर त्या ठिकाणचे मुस्लिम लोक सांगतात की, देशांमध्ये जरी हिंसाचाराचं वातावरण त्यावेळेस असलं तरी इंदूर आणि महेश्वर मध्ये मात्र सर्वधर्मसमभाव बंधुत्वाच नात होते. याचे एकमेव कारण म्हणजे मातोश्री. अहिल्यामाई यांनी जी समतेची शिकवण आम्हाला दिली त्यामुळे आमच्याकडे बंधुत्वाचे नाते आजही कायम आहे.

अहिल्याबाई यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. त्या महादेवाच्या भक्त होत्या, परंतु त्याचबरोबर मातोश्रींनी मुस्लिम समाजासाठी देखील मुस्लिम दर्गे बांधण्याचं काम अनेक ठिकाणी केलेले दिसून येते. सर्व जाती धर्मासाठी मातोश्री यांनी काम त्या काळामध्ये केले.

त्याच्या पुढचे उदाहरण म्हणजे मातोश्रींनी त्यावेळेस घोषणा केली की, माझी एकुलती एक मुलगी मुक्ता हीचा विवाह अशा मुलाशी करेल जो कर्तुत्वान असेल ज्याच्या मध्ये नेतृत्व करण्याची धमक असेल व या राज्यातील भिल्लांचा बंदोबस्त करेल. भले तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो. कर्तुत्व आणि नेतृत्व हे कधीच जातीमध्ये तोलायचं नसतं ही शिकवण मातोश्री त्यावेळेस दिली.

शेती,व्यापार, उद्योग, कला क्षेत्रातील कामगिरी-

शेती सुधारली तरच राज्याची सुधारणा असून, प्रजेच्या जगण्याचे प्रश्‍न शेती उत्पादनातून सुटत असतात. शेती व्यवसाय हा राजा आणि प्रजेचा आधारभूत पाया आहे.

असा विचार शेतीबाबत व शेतकऱ्यांच्या बाबत मातोश्री यांचा होता.

त्यासाठीच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देखील मातोश्री देत होत्या. अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम देखील मातोश्रींनी त्या काळामध्ये केले. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी वेळोवेळी सोडवण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना तसे आदेश देऊन अंमलबजावणी करून घेण्यात येत असे.

विशिष्ट दिवस ठरवून त्या दिवशी मातोश्री स्वतः शेतामध्ये जाऊन शेताच्या चारी दिशेला कुदळ मारून नांगरणी ला सुरुवात करून देत. आणि शेतकऱ्यांच्या बी बियाण्याची ही व्यवस्था करीत. शेतसारा ठरवत असताना शेतकर्‍यांना जास्त वाटणार नाही. आणि त्यांनी स्वखुशीने कर भरावेत. असा योग्य कर मातोश्री त्यावेळेस बसवत. कर बसवताना दरवर्षी सर्व्हे करून पीक पाणी पाहून शेतसार्‍याबद्दल विचार करीत. पावसाळा झाला नाही किंवा पाऊस कमी प्रमाणात पडून शेतीचे उत्पन्न घटले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा मातोश्री त्या काळामध्ये करत.

स्वतःच्या सैन्याकडून जर शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले तर मातोश्री स्वतः त्याची भरपाई करून देण्याचे काम करायचा अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मातोश्री महत्त्वाची पावले उचलली होती.

व्यापार क्षेत्र

व्यापार आणि रोजगार या दोन्ही गोष्टींवर मातोश्रींनी विशेष लक्ष केंद्रित केलेली दिसून येते. कारण राज्यातला युवक बेरोजगार नसला पाहिजे. यासाठी अनेक उद्योगधंदे ची निर्मिती त्यावेळेस मातोश्रींनी केली. याचेच उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर आज पैठणी ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु त्या काळामध्ये महेश्वर ची महेश्वरी साडी ही जगप्रसिद्ध होती. त्या साडीला जगभरातून मागणी होती आणि हा उद्योग उभा करण्याचं काम मातोश्रींनी त्यावेळेस केलेले होते.

मातोश्रींनी देश-विदेशातील कारागिरांना स्वतःच्या राज्यामध्ये स्थान दिलं त्यांना त्यांचे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत केल्या आणि म्हणूनच कौशल्यावर आधारित रोजगार ही संकल्पना आज देशामध्ये उभी राहिली. आयटीआय संस्था देशभरामध्ये उभी आहे. त्याच्या पाठी मागची थीम कौशल्यावर आधारित रोजगार हे मातोश्रींनी त्या वेळेस जे त्यांच्या राज्यामध्ये राबवले होते. त्याचाच आधार घेऊन आयटीआय ची निर्मिती झाली आहे.

कवी कलाकर साहित्यिक यांना प्रोहत्सान -

मातोश्रींच्या राज्यांमध्ये कवी आणि कलाकार यांना राजाश्रय मिळाला होता. इतर राज्यातील कवी कलाकार लोक मातेच्या राज्यात येऊन राहत असत. शाहीर कवी नाटककार आणि लोकहितार्थ साहित्य लिहावे व लोक करमणुकीपेक्षा लोकजागृतीचे कार्य करावे असे मातोश्रींना कायम वाटत होते. आणि त्यांनी ती जागृती घडवून देखील आली होती.

कवी कलाकारांना मातोश्री यांनी त्यावेळेस आर्थिक साहाय्य देऊन साहित्य क्षेत्रामध्ये निर्मिती करण्यासाठी चे बळ मातोश्रींनी त्यावेळेस साहित्यिकांना दिले.

"प्रजेच्या सुखात राजाचें सुख आहे, आणि प्रजेच्या गीतात राज्याचे हित आहे. राजाची सुख हे सुख नसून प्रजा सुखी राहण्याममध्येच राजाचे सुख आहे."

याच उक्तीप्रमाणे मातोश्रींनी कार्य केले.

जलव्यवस्थापन

आज देशामध्ये पाण्याचा प्रश्न हा लोकांसाठी एक महत्त्वाचा व ऐरणीचा प्रश्न ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बारकाईने निरीक्षण केले तर आज देखील आपल्या सभोवतालच्या जुन्या बारवांना पाणी दिसून येते. हे जलव्यवस्थापनचा उत्कृष्ट नमुना त्यावेळेस मातोश्री देशभरामध्ये उभा केला.

देशभरात बारवांची निर्मिती केली. संवर्धन केलं पक्षी, प्राणी, मनुष्य या पृथ्वीवरचा कोणताही सजीव पाण्याशिवाय

राहता कामा नये याची चोख व्यवस्था मातोश्री यांनी केली.

याचेच एक उदाहरण म्हणून पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील मंदिराच्या बाजूला मातोश्री यांनी बांधलेला फार मोठा तलाव देखील आपल्याला आज पाहता येतो.

पंढरपूरचा विठोबा आणि मातोश्री

महाराष्ट्राला आणि देशाला संतांची फार मोठी परंपरा आहे. मातोश्री पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्त होत्या. ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी संत तुकोबारायांच्या पालखी ला संरक्षण दिले. त्याचप्रमाणे त्या पालखीत ला येणारा प्रत्येक वारकरी, महाराष्ट्रातून येणारा वारकरी त्याची राहण्याची व्यवस्था पंढरपूर मध्ये झाली पाहिजे. यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पुढे मातोश्री यांनी होळकर वाडा बांधला. तो भव्य असा होळकर वाडा त्या काळामध्ये थकलेल्या, तहानलेल्या वारकऱ्यांसाठी त्यावेळेस आश्रय विश्रांती व राहण्याचे ठिकाण होळकर वाड्यात होते.

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा दिवाबत्ती चा खर्च देखील मातोश्री व मातोश्रींचे पती खंडेराव होळकर यांनी त्या वेळी सुरू केला होता. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दिवाबत्ती झाली पाहिजे आणि त्या दिवाबत्ती चा खर्च हे होळकर संस्थान आज ही चोख पार पाडत आहे.

छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री

स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर येथे स्मारक आहे. या स्मारकाच्या तिथे तीन नद्यांचा संगम आहे. या तीन नद्यांच्या संगमावर घाट बांधण्याचं काम मातोश्रींनी त्यावेळेस केले. तेथील मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या स्मारकासाठी सुद्धा मातोश्रींनी त्यावेळेस महत्त्वाचे असे काम केले.

मातोश्रींचे एक वाक्य त्या काळामध्ये होते त्या सांगतात की

"आम्हाकडील लोकांची कामे चांगली होतात. परंतु आमचे उजेडात आणणारे कोणी नाही न होत्याचे त्याचे उजेडात येते काय करावे दिवसच असे आहेत."

याच वाक्याप्रमाणे आज देखील घडल्याचे दिसून येते मातोश्रींचा व्यापक आणि खरा इतिहास पुढे येणे हे गरजेचे आहे.

मृत्यू

मातोश्रींनी सबंध आयुष्य रंजले, गांजले यांसाठी खर्ची घातलं. अगोदर पती सासरे मुलगा एवढेच नाही तर स्व कुटुंबातील 27 मृत्यू मातोश्रींनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. तरीसुद्धा त्या खचल्या नाहीत. प्रजेसाठी प्रजेच्या सेवेसाठी अखंड आयुष्य खर्ची घातलं.

मातोश्री नेहमी सांगत असत

"माझ्या प्रत्येक कृतीस मी स्वतः जबाबदार असेन."

स्वतःची जबाबदारी मातोश्री मी कधीच दुसऱ्यावर ढकलली नाही. प्रजा हेच सर्वस्व प्रजा हेच आयुष्य. म्हणून अखंड आयुष्यभर प्रजेची सेवा करण्यातच मातोश्रींनी सर्वस्व मानले अशा या महान कतृत्वान मातोश्री चा मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ ला झाला.

अविनाश धायगुडे

(प्रसिद्ध व्याख्याते)

मो- 9423242415

Tags:    

Similar News