मुलीने आंतरजातीय विवाह केल्यानंतर मुलाच्या घरी जाऊन आई-वडिलांनी मुलीला फरफटत ओढत नेल्याची घटना आता समाजमाध्यमातून समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीचे मोर्शी तालुक्यातील अंबाडा इथं राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या तिने नुकतेच काही दिवसांपूर्वी त्या मुलासोबत लग्न केले व ती त्याच्यासोबत त्याच्या घरी राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ही सर्व माहिती मिळतच मुलीचे आई वडिल आणि इतर नातेवाईक हे मुलाच्या घरी पोहोचले. त्यानंतर सगळ्यांसमोर त्यांनी मुलीला उचलून फरफटत घरी घेऊन गेले.
या घटनेचा सर्व व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ती मुलगी आपल्याला इथंच राहायचं आहे अशी विनवणी करत असल्याचं सुद्धा दिसत आहे. पण, आई-वडिलांनी तिचे काहीही न ऐकता हात आणि पाय धरून मुलीला अक्षरश: घरातून उचलून नेले आहे. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणानंतर मुलाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मुलीकडच्या नातेवाईकांविरुद्ध मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
सावरखेड येथील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील युवकाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येथे विवाह केला. त्यानंतर मुलगीही 4 मे रोजी मुलगी मुलाच्या घरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतर आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना कळाले. मग त्या मुलीचे आई-वडलांसह दहा ते बारा जण अंबाडा येथे गेले व त्यांनी मुलीला जाब विचारला. त्यानंतर मुलीला फरफटत, मारहाण करत उचलून नेले. ही घटना ४ मे रोजी घडली होती. ४ मे रोजीच प्रतीकने मोर्शी पोलीस ठाण्यात आपल्या पत्नीला मारहाण करून घेऊन गेल्याची तक्रार दाखल केलेली आहे.
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे चौकशी करण्याचे निर्देश
या सगळ्या प्रकरणावर अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या घटनेची तात्काळ माहिती घेऊन याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाकूर यांनी म्हंटल आहे की, सदर घटनेबद्दलची माहिती वृत्त माध्यमातून माझ्यासमोर आली आहे. याबाबत संबंधितांकडून तात्काळ माहिती घेऊन याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलिसांनी यात तक्रार दाखल करून उचित कारवाई करावी याबाबतच्या सूचना दिल्या जातील. मी या घटनेतील त्या मुलीशी संपर्क साधून यातील सत्यता पडताळून घेणार आहे. परंतु मेळघाट येथे दुर्गम भागात दौरा सुरू असल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.