अफगानी महिला पायलट साफिया फिरोजला तालीबानी लोकांनी मारलं का?

सफियाला तालिबानच्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारण्यात आल्याचा दावा केला जात आहे.;

Update: 2021-08-20 02:15 GMT

सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला रक्ताळलेल्या चेहऱ्याने पुरुषांच्या घेराव्यात अडकली असल्याचं दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की, फोटोमधील महिला ही कॅप्टन सफिया फिरोज आहे. जी अफगाणिस्तानच्या हवाई दलात भरती होणारी दुसरी महिला पायलट आहे. दरम्यान, सफियाला तालिबानच्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारण्यात आल्याचा दावा करत हा फोटो मोठ्याप्रमाणात शेअर केला जात आहे.

मात्र, हा दावा पूर्णतः खोटा असल्याचं आम्हाला आढळून आलं. व्हायरल होणारा फोटो हा 2015 चा असून फोटोमधील महिलेचं नाव फरखुंदा मलिकजादा आहे.

इस्लामिक अभ्यास करणाऱ्या या 27 वर्षीय विद्यार्थीनीची काबूलच्या रस्त्यावर कुराण जाळल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. याशिवाय आम्हाला सफिया फिरोज किंवा तिच्यासंदर्भात कोणतीही बातमी अद्याप पर्यंत सापडली नाही.

दरम्यान, 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्याच्या पार्श्वभूमीवर हा फोटो व्हायरल केला जात आहे. याअगोदरही असे कित्येक खोटे दावे केले गेले आहेत.

सत्य पडताळणी...

ट्विटर युजर संगीतसागर यांनी देखील हा फोटो बुधवारी संध्याकाळी ट्विट केला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात - "सफिया फिरोज, अफगाण हवाई दलाच्या चार महिला वैमानिकांपैकी एक, त्यांना आज सकाळी सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून मारण्यात आले."

दरम्यान, की वर्ड सर्च केले असता, आम्हाला फेसबुकवर अनेक लोकांनी संगीतसागर यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केल्याचं आढळून आलं. प्रत्येक पोस्टमध्ये फोटोमधील महिला ही सफिया फिरोज असल्याचं म्हणत त्यांना ठार केल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, आम्हाला XYZ या वेबसाइट्सचा एक रिपोर्ट मिळाला. ज्यामध्ये संगीतसागर यांच्या ट्विटचा हवाला देत सफियाला खरंच ठार मारण्यात आलं का? यासंदर्भात विस्तृत अहवाल दिला आहे. याशिवाय, सफियाला ठार केल्याचे दावे फक्त भारतीय यूजर्सनेच केले आहेत. दावा करणाऱ्यांपैकी कोणीही अफगाणी नाही.

व्हायरल होणाऱ्या या फोटोचे रिव्हर्स इमेज सर्च केले असता, "फरखुंडाची लिंचिंग" बद्दल अनेक रिजल्ट पाहायला मिळाले. अधिक शोध घेतल्यावर आम्हाला आढळून आलं की, हा फोटो फरखुंदा मलिकजादाच्या खुनासंदर्भात आहे, जिला कुराण जाळण्याच्या संशयावरून डिसेंबर 2015 मध्ये संतप्त जमावाने सार्वजनिक ठिकाणी मारले गेले.

मलिकजादाने एका मुल्ला किंवा धार्मिक शिक्षकाशी, एका मंदिरात महिलांना दान देण्याच्या प्रथेबद्दल वाद घातला होता. वादाच्या ओघात तिच्यावर कुराण जाळल्याचा आरोप झाला आणि तिथे जमलेल्या जमावाने तिच्यावर हल्ला केला.

न्यूयॉर्क टाइम्सने मॉब लिंचिंगचं फुटेजही प्रसिद्ध केलं होतं. दरम्यान, या फुटेजच्या शेवटी, आम्हाला एक फ्रेम सापडली जी व्हायरल होत असलेल्या फोटोशी अचूक जुळणारी होती. 26 दिसंबर 2015 च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या या व्हिडीओचं शिर्षक 'The Killing of Farkhunda' https://www.nytimes.com/video/world/asia/100000004108808/the-killing-of-farkhunda.html असं आहे.

6 मिनट 27 सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये एक फ्रेम दिसून येते. ज्यामध्ये सफिया फिरोज हिच्या नावाने व्हायरल होत असलेली फ्रेम दिसते.

एकूणच, हा फोटो 2015 च्या मॉब लिंचिंगचा असून घटनेतील पीडित व्यक्ती ही अफगाण पायलट सफिया फिरोज नसून इस्लामिक अभ्यासाची विद्यार्थी फरखुंदा मलिकजादा आहे. बुम लाईव्ह ने देखील या संदर्भात फॅक्टचेक केलं आहे.

निष्कर्श

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून असे अनेक खोटे दावे केले जात आहेत. तर दिवसेंदिवस या दाव्यांची संख्या वाढतच आहे.

Tags:    

Similar News