16 डिसेंबरपासून राज्य महिला आयोग राबवणार आदिशक्ती अभियान!

Update: 2021-12-15 13:38 GMT

देशामध्ये डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य महिला आयोग १६ डिसेंबर पासून राज्यभरात "आदिशक्ती अभियान" राबवणार आहे. या अभियानाची सुरूवात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रंगशारदा सभागृह , बांद्रा वेस्ट , मुंबई येथे संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे. विशेष म्हणजे या अभियानाची संकल्पना आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची आहे.

स्त्री शिकून कितीही स्वावलंबी झाली, प्रगतीची असंख्य शिखरं तिने पार करुन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला तरी ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली किंवा निर्भय झाली असं आजही म्हणता येणार नाही. आजही घरी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी महिलांवर अत्याचार होतंच आहेत. फक्त रात्रीच नव्हे तर भर दिवसादेखील रस्त्याने जाताना महिलांना आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेकदा अङचणींचा सामना करावा लागतो. २०१२ साली घडलेलं निर्भया प्रकरण हे सुद्धा अशाच अत्याचारांचं एक हृदयद्रावक उदाहरण. या घटनेला १६ डिसेंबर २०२१ ला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी, याविषयी समाजात जनजागृती व्हावी यासाठी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, महिलांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी, त्यांना स्वसंरक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभरात आदिशक्ती अभियान महिला आयोग राबवणार आहेत.


या अभियानाच्या अंतर्गत वर्षभर महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे, यामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा , घरगुती हिंसाचार , कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक ञास आणि लैंगिक अत्याचार , कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न , शाळकरी मुलींसह तरुणींना सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास , महिलांसाठी सायबर सिक्युरिटी , वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला असणारा वाव या सर्व मुद्द्यांवर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाकडून देण्यात आली.


१६ डिसेंबर रोजी याच सभागृहात "महिलांची सुरक्षितता: काल,आज आणि ऊद्या " या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी हावरे ऊद्योग समुहाच्या अध्यक्षा ऊज्वला हावरे , ऊच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या आणि महिलाविषयी ऊल्लेखनीय काम करणाऱ्या आणि कायदेशीर सल्लागार अॕड. श्रीमती दिव्या चव्हाण , प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व घरगुती हिंसा व त्याची कारणे या विषयातील तज्ञ, समुपदेशक श्रीमती शिरीषा साठे , श्रीमती कल्पिता पिंपळे ,सहाय्यक आयुक्त महानगरपालिका ठाणे , पुर्णब्रम्ह ऊद्योग समूहाच्या श्रीमती जयंती कठाळे , स्नेहालय संस्थेच्या समन्वयक श्रीमती शुभांगी रोहकाळे ऊपस्थित राहणार आहेत.

यावेळी महिला व बालविकास मंञी श्रीमती यशोमती ठाकुर ,महाराष्ट्रराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॕड.श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर ,विधान परिषदेच्या सदस्या प्रा.डॉ.श्रीमती मनीषा कायंदे यांची उपस्थिती असणार आहे.

Tags:    

Similar News