तरूणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सुनावली १० वर्षांची शिक्षा
दीड वर्षापुर्वी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब टेस्ट घेण्यात आल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली होती. अमरावतीमधील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला होता. तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला असून आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी अल्केश विरोधात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तरूणीच्या तक्रारीवरून आरोपी अलकेशविरोधात बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ऑफिसमधील सहकाऱ्याला कोव्हिडची लागण झाल्याने २८ जुलै २०२० रोजी तरुणी कोव्हिड चाचणीसाठी गेली होती. नोकरीनिमित्त ती अमरावतीमध्ये तिच्या भावाकडे राहत होती. तिच्यासोबत इतरांचीही कोव्हिड चाचणी केली गेली. पण नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगत तिला पुन्हा बोलावण्यात आलं होतं. आरोपीने अल्केशने तरुणीला युरिनल स्वॅब टेस्ट करावी लागेल असं सांगितलं. यावेळी तिच्यासोबत महिला सहकारीदेखील होती. त्यांनी महिला कर्मचारी आहेत का? असं विचारल्यावर आरोपीने नकार दिला. यानंतर त्याने तरूणीच्या गुप्तांगातून स्वॅब नमुने घेतले आणि रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. पण अशा पद्धतीने गुप्तांगातून नमुने घेतल्याबद्दल तरूणीला शंका आली आणि तिने भावाला सांगितलं. या दोघांनीही डॉक्टरांकडे चौकशी केली तर अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं निष्पण्ण झालं. त्यावेळी तातडीने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनूसार पोलिसांनी तपासानंतर आरोपी अल्केशला अटक केली होती.