पारनेरच्या जवळा गावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; 4 संशयित ताब्यात

Update: 2021-10-22 02:04 GMT

 अहमदनगर जिल्ह्यातील सतत घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांनी कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या जवळे येथे अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, ही आत्महत्या की खून? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, काल रात्री उशिरा पोलिसांनी चार संशियत आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काल दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान गावाजवळच असलेल्या वस्तीवर एका अल्पवयीन मुलीचा घरातच संशयास्पद मृतदेह आढळून आला. या मुलीचे आई-वडील मोल मजुरी करतात आपला नेहमीप्रमाणे ते मजुरीसाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास मुलीचा लहान भाऊ शिकवणीसाठी गेला. त्यानंतर या मुलीचा घातपात झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक धावून आले. त्यांनी मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पारनेर पोलिस ठाण्यात तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे , पोलिस पुढील तपास करत आहेत , तपासाअंती सत्य काय? ते समोर येईल असं म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी सीआयडी तपास करावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

Tags:    

Similar News