करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या जानवर चित्रपटात शिल्पा शेट्टीचा मुलगा ट्रेन अपघातात नदी पात्रात पडून गायब होतो. तो अक्षय कुमारला मिळतो आणि अक्षय कुमार अर्थात चित्रपटातील बाबू लोहार या मुलाचा सांभाळ करतो. बरीच वर्ष शिल्पा शेट्टी त्या मुलाच्या शोधत असते. आणि शेवटी तिला तिचा हरवलेला मुलगा मिळतो. चित्रपटांमध्ये अनेकदा आपण बघतो की, कधी कधी आई वडिलांना आपलं मूल नकोसं असतं, मग ते मूलाला मंदिरात सोडून निघून जातात. मग कुणीतरी दयाळू व्यक्ती येते आणि या बालकाला घेऊन जाते. तरुणाईमध्ये आल्यावर हे बाळ आपल्या आई वडिलांच्या शोधात भटकत असतं, चित्रपटात घडणाऱ्या या घटना खरच प्रत्यक्षात घडतात का? हे जाणून घेऊया
21 वर्षांपूर्वी बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात एका निर्दयी जोडप्याने आपल्या चिमुकल्या मुलीला मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवून पळ काढला होता. आता ती मुलगी फ्रान्सहून आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या शोधात परळीमध्ये दाखल झाली आहे. नेहा आसांते असं या मुलीचे नाव आहे.
फ्रान्समधील आसांते कुटुंबाने नेहाचे सांत्वन आणि जबाबदारी घेतली आणि तिला मोठं केलं. आता 21 वर्षानंतर नेहा आपल्या मूळ आई-वडिलांच्या शोधात परत आली आहे.
8 जून 2002 रोजी हे बाळ मंदिराचे तत्कालीन लेखापाल विनायक खिस्ते यांना आढळून आलं. यानंतर तिला बालकाश्रम पंढरपूर आणि प्रीतम मंदिर पुणे या संस्थांमध्ये दाखल करण्यात आलं.
2020 मध्ये नेहा आणि अॅडव्होकेट अंजली पवार यांनी नेहाच्या जन्मदाते आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. दगडू दादा लोमटे, बाळासाहेब देशमुख आणि विनायक खीस्ते यांच्या मदतीने ती परळीमध्ये पोहोचली.
नेहा आणि अंजली पवार यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, जर त्यांना या नेहाबाबत काही माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा.
नेहाचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. आपल्या आई-वडिलांशी भेटण्याची आणि आपल्या मुळांचा शोध घेण्याची इच्छा पूर्ण होईल का हे पाहणे गरजचे आहे.