दिराने केला वहिनीवर बलात्कार, भाजप नगराध्यक्षासह आरोपी मुलावर गुन्हा दाखल

भाजप नगराध्यक्षासह त्याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल, महिला आयोगाने घेतली दखल;

Update: 2022-04-10 08:11 GMT

हिंगोलीच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर या पिडीत विवाहितेला मौन बाळगण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोलीच्या माजी नगराध्यक्षांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी २०२१ मध्ये ही बलात्काराची घटना घडली असुन एप्रिल महिन्यात पिडीत महिलेने हिंगोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १३ जानेवारी ते २०२१ ते २० जानेवारी २०२१ या कालावधीदरम्यान हि घटना घडल्याचे पिडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले असुन पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. या पिता-पुत्रावर दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं होतं?

या संदर्भात हिंगोली पोलिसांनी मॅक्स वुमनला माहिती देताना सांगितले की, १३ जानेवारी २०२१ रोजी पिडीतेच्या सासूचं निधन झालं होतं. घरातील इतर सर्व जण अंत्यविधासाठी गेले असता घरात फक्त पिडीता आणि आरोपी दोघेच होते. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपी रोहन बाबाराव बांगर याने त्याच्याच चुलत वहिनीचे तोंड रूमालाने दाबून तिच्यासोबत जबरदस्तीचा संभोग केला. पिडीता भिती पोटी शांत राहिली. कारण आरोपी असलेला रोहन हा नात्याने तिचा सख्खा चुलत दिर लागतो. तिचे सासरे आणि आरोपीचे वडील तसेच भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबराव बांगर हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

काही दिवसांनी म्हणजेच २० जानेवारी २०२१ रोजी पिडीता घराच्या वरच्या मजल्यावर फरशी साफ करण्यासाठी गेली असता आरोपी रोहनने पुन्हा एकदा तिच्यावर बळजबरी केली. पण यावेळी इतर सदस्य घरात उपस्थित होते. त्यामुळे पिडीतेने आरडा ओरड केली आणि सारे सदस्य घटनास्थळी गेले. प्रकरण बाहेर आलं तर घराची बदनामी होईल या भितीपोटी पिडीतेचे चुलत सासरे तसेच भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी तिला मौन बाळगण्यास सांगितले. तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पिडीतेला माहेरी पाठवून देण्यात आले.


काही दिवसांनी आपल्याला सासरी पुन्हा घेऊन जातील या आशेपोटी पिडीता मुग गिळून गप्प राहिली. सदर घटनेची तिने कुठेही वाच्यता केली नाही. परंतू आजता गायत तिला सासरी नेण्यासाठी कुणीही आले नसल्याने तिने हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ७ एप्रिल २०२२ रोजी तक्रार दाखल केली. तिच्या याच तक्रारीची दखल महिला आयोगाने घेत आरोपींवर कडक कारवाई करून आयोगासमोर अहवाल सादर करण्याचे आदेश हिंगोली पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाने ट्विट करून दिली आहे.

दोघांवरही गुन्हा दाखल

या प्रकरणी रोहन बाबाराव बांगर याच्यावर बलात्काराचा तर गुन्ह्याची वाच्यता न करण्यास सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही आरोपी फारार असून हिंगोली शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Tags:    

Similar News