''भाजप-सेना युतीसाठी उद्धव ठाकरे तयार होते पण.."

Update: 2022-07-20 03:03 GMT

४० आमदारांपाठोपाठ उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेनेच्या १२ खासादारांनीही आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महाविकास आघाडी सरकार असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत युतीबाबत चर्चा झाली होती. पण त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली आणि शिवसेनेकडून युतीबाबत प्रस्ताव न आल्याने भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.

एवढेच नाही तर आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्री करणार असतील तर आपण युतीसाठी तयार आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. तसेच मीही युतीसाठी प्रयत्न करतो आणि तुम्हीही करा असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. पण नंतर संजय राऊत यांनी या युतीच्या बोलणीत खोडा घातल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला आहे.

दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी भेट घेऊन राहुल शेवाळे हे गटनेते आणि भावना गवळी पक्षाच्या प्रतोद असल्याचे पत्र दिल्याची माहितीही शेवाळे यांनी दिली. तसेच आम्ही सर्व खासदार शिवसेनेतच आहोत दुसरा कोणताही गट स्थापन केलेला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News