वसई-विरार आयुक्तालयावर १२ तारखेला मनसे महिला सेनेचा हल्लाबोलः मनसे नेत्या रूपाली पाटील यांची घोषणा.
गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे आणि वसई-विरार महिपालिकेचे आयुक्त गंगाथरन यांचे वारंवार वाद होताना दिसत आहेत. मंगळवारी ५ जानेवारीला शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वसईतील कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. "आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या" अशा घोषणा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या.
त्यानंतर वसई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना कार्यक्रम स्थळी तैनात असलेले पोलीस अधिक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्या कार्यकर्त्यांना मारहाण करत, आई-बहिणींवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. कायद्याने आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करणे किंवा त्यांना कार्यक्रम स्थळून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊन सोडणे अपेक्षित होतं. मात्र मनसे विरोधात आयुक्तांच्या असलेल्या आकसापोटी पोलीसांनी ही कारवाई केल्याचाही आरोप मनसेने केला आहे.
पोलीस अधिक्षक राजेंद्र कांबळे यांनी पदाचा गैरवापर केला आहे, त्यामुळे त्यांचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्यामुळे मनसे महिला सेना पोलीस अधिक्षक राजेंद्र कांबळे यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाली आहे.
"मनसे कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न मांडता यावेत यासाठी आयुक्त गंगाथरन यांच्याकडे वेळ वारंवार वेळ मागुनही त्यांनी वेळ दिली नाही. म्हणून नाईलाजाने त्यांना त्या कार्यक्रमात घोषणाबाजी करावी लागली. त्यावर या कार्यकर्त्यांना अटक आणि शिवीगाळ करणं चुकीचं होतं. आता त्यांना मनसे हिसका दाखवणार आणि येत्या १२ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महिला मनसे कार्यकर्त्यांसहित वसई-विरार मध्ये धडक देणार." असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी एका व्हिडिओ द्वारे दिला आहे.