सरपंच बाई गावात नाहीत आणि पाटीलही गावात नाही त आता तर भलतीच पंचाईत होईल. क्षणभर मला काहीच सुचेना. थोड घाबरायला झालं .कारण या दोघांशिवायचा विचार मी केलाच नव्हता .आधी टपरीवाला मस्त चहा करायला सांगितला आणि सहजच त्याच्याशी गप्पा मारायला लागले. संवादातून बरेच प्रश्न सुटतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे .त्याला सहजच विचारलं, तुमच्या गावात तरुण मुलं भरपूर असतील ना? काही कामधंदे करतात की नुसतेच घरी खाटेवर लोळत पडतात ही मुलं? शेतीच्या कामावर वगैरे जातात काय? आणि तुमच्या गावातल्या पोरांना राजकारणात इंटरेस्ट आहे काय? तो म्हणाला ,"हो जी खूप सारे पोरं नुसते वडाच्या झाडाखाली बसून बाताड्या हाकलत बसतात ;पण काही पोरं शेतीवाडी करतात ,ट्रॅक्टर चालवतात .एका पोराची चक्की हाय. असं काही काही करत राहतात."
" तुमच्या गावात गणपती किंवा दुर्गा देवी बसतात का ?"
" हो तं .गणपती त पाटीलच बसवते ,पण दुर्गादेवी मात्र गावातले पोरं एकत्र येऊन ते बसवतात."
"ही देवी बसवणारी पोरं आता गावात असतील ?"
"त्यातली काही असू शकतात. काही कुठे इकडे तिकडे गेली असतील.नाही नक्की नाही सांगता येत."
" त्यातल्या एक दोघांची नावं सांगा ना भाऊ ."
"सांगतो .बबलू शिंदे ,विजय गायकवाड, सारंग तेलरांधे ,सारंग जाधव ,सुनील कल्याणकर ."
"ब
"बर ,तुम्हाला तर सगळ्यांची नावं पाठ आहे."
त्यांनी तयार केलेला चहा मला दिला .तू पिऊन, त्यांना त्यांचे पैसे देऊन मी पुढे निघाले .खरं म्हणजे आतून जरा नर्व्हस झाले होते .आता चांगलंच अंधारलेलं होतं .गावाच्या दिशेला जाताजाता पांधन लागली. त्या पंधनितून जात असताना तुरीची झाडं मस्त तरारून वर आले ली, कापूस फुटलेला,उंच गेलेली ज्वारीची कणस या सगळ्या झाडांची सळसळ त्या अंधारात भर घालत होती थोडी पुढे जात नाही तोच एकट दुखत बाया पं पांधणी च्या बाजूला टॉयलेटला बसलेल्या दिसल्या . म्हणजे याही गावात संडास चा प्रॉब्लेम आहे तर. हे मी मनाशीच पुटपुटले .आणखी थोडे पुढे गेले. बाया उठून उभ्या राहत होत्या .मला हे आणखीच नेहमीच विचित्र वाटतं .कारण मी नेहमीच पाहते की शी करायला बसलेल्या बाया माणूस दिसलं की उभ्या राहतात. उलट गपचूप खाली मान घालून बसून राहिल्या तर तिथून जाणाऱ्या चं फारस लक्ष जाणार नाही. पण त्या उठून उभ्या राहिल्या की चक्क त्यांचे चेहरे दिसतात. ते त्यांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी .पण हे चित्र अख्ख्या महाराष्ट्रात मी नेहमीच बघत होते आणि अजूनही बघते. दोन बायांची शी झालेली होती आणि त्या रस्त्याला लागल्या होत्या .त्यांनी मला विचारलं कुणीकडून आल्याजी?"मी म्हटलं ,"नागपूरहून "कुणाकडे जायचं आहे?"
" गायकवाड च्या घरी "
"कोणते गायकवाड? "
"विजय गायकवाड "
" तो त फटफटी घेऊन आत्ताच गेला ."
"बरं मग तेलरांधे ?"
"त्याच्याच मागे बसून तो बी गेला".
" ठीक आहे ."
आता मी कपाळाला हात मारायचा तेवढा शिल्लक ठेवला. आज काय बरं झालं! कोणीच गावात भेटत नाही. एक एक करत साईडला टॉयलेटला बसलेल्या सगळ्या बाया तिथून झपझप चालत पसार झाल्यात. जाता जाता एका वावरामध्ये मला काही स्त्रियांची झुंड दिसली .त्यांच्यासोबत तीन-चार पुरुष दोन-तीन लहान मुले होती. मला थोडं कुतूहल वाटलं ,की या शेतामध्ये हे पंधरा-वीस लोक काय करत असतील ?मी त्यांच्याजवळ गेले .त्यांना विचारलं "तुम्ही सगळेच्या सगळे कुठून आलात ?आणि इथे का बसलात ?"
त्यांनी सांगितलं विटांच्या हात भट्टीवर काम करण्यासाठी आम्ही आलेलो आहे." मी ठीक आहे म्हणून पुढे निघाले. थोडं पुढे जात नाही तर खूप सार्या शेळ्या घेऊन बाया-माणसं त्या शेतात छोट्या छोट्या झोपड्या करून थांबलेली होती. हे दृश्य माझ्या लहानपणी मी आमच्या शेतात अनेकदा बघितलं होतं. कुठून तरी हे लोक यायचे. आमच्या शेतामध्ये थांबायचे. तिथेच त्यांचा खाणं-पिणं असायचं .त्या शेळ्या मेंढ्या पण तिथेच राहायचा . ते कुठून यायचे, पुढे कुठे जायचे,माझा भाऊ त्यांना ती जागा का द्यायचा, मला कधीच कळलं नाही .आणि त्या बारकाव्यात जाण्याच आमचं काही कारण नव्हते. शेती वाढीच्या कारभारात आमच्या घरात मोठा भाऊ आणि आई सोडून कोणीच मध्ये बोलत नसे.पण आज या लोकांना बघून ते दृश्य मात्र डोळ्यासमोर उभा राहील.
दुरूनच आता गावातले एकट दुकट लाईट दिसायला लागले . थोडे जवळ गेल्यावर बैलांच्या ओरडण्याचा आणि गाईंच्या हंबरन्याचा आवाज यायला लागला. मधेच रस्त्यावर दोन तीन म्हशी बसलेल्या होत्या. त्यांना ओलांडून मी पुढे गेले ,तर एका झाडाखाली चार पाच माणसं बसलेली होती ,त्यांना विचारलं गायकवाड यांचे घर कुठे आहे ?त्यांनी डाव्या हाताच्या गल्लीत बोट करून सांगितलं तिकडे सरळ जा. विजेचा खंबा लागेल, त्याच्यासमोरच घर गायकवाड यांचं.
" विजय गायकवाड इथेच राहतात ना ?"
"ते दोन तिन गायकवाड एकाला एक लागून राहतात. विजय गायकवाड च घर मधल आहे." मी पुढे येते . इलेक्ट्रिक पोल दिसल्याबरोबर मी समोरच्या दिशेने बघितलं ,तर ओळीने तीन सारखी घर मला दिसलीत. त्यातल मधलं घर विजयचं म्हणून मी मधल्या घरासमोर उभी राहिले.एक मुलगा समोर आपल्या बहिणी सोबत टिक्कर बिल्ला खेळत होता .त्यांनी मला विचारलं ,"कोण पाहिजे?"
मी म्हटलं "विजय भाऊ".
"काका नाही घरात .तो बाहेर गेला .
"बरं मग विजय काका ची आई आहे का ?"
"हो,आहे ." तो ओरडला, आजी... त्याच्या ओरडण्याने कोणीतरी बाहेर येता येता आतून जोरात आवाज आला," आता कोण आलं रात्रीच ?त्यांना सांग, विजय घरात नाही आणि विज्याचे बाबा पण घरात नाही"
" अगं नाही नाही. त्या तुझ्याच कडे आल्या .असं म्हणून एक साठीतली बाई दारात आली. त्यांनी विचारलं ,"कोण पाहिजे? आपण कोण?
मी त्यांना सांगितलं ,"मी नागपूरहून आले .मला खरं म्हणजे सरपंच बाईंकडे काम होतं आणि त्या नसतील तर पाटील साहेबांना मी भेटणार होते .पण ते दोघेही गावात नाही त. म्हणून मी तुमच्याकडे आले. तुमचा मुलगा इथली दुर्गादेवी बसवण्यात खूप मोठा पुढाकार घेतो आणि तो गावातल्या लोकांची कामही करतो .त्यांना मदत करतो असं मी ऐकलं .मलाही थोडीशी मदत हवी होती ,म्हणून मी नेमकी तुमच्याकडे आले ."
"बरोबर आहे.आमचा विज्या सारखी धाव धाव करत असतो. पण काय मदत हवी तुम्हाला? काय काम आहे? कारण आता तो तर नाही. तो रात्री नऊ दहा वाजेपर्यंत येईल."
"बरं .मग मी तुमच्याशी बोलते. काकू मी नागपूर हुन आले. अरुणा सबाने .मी महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये फिरते आहे .मला खेड्यांचा सर्वे करायचा आहे .तिथे पाण्याची व्यवस्था, रस्ते ,वीज ,औषध, उपचार ,वाचनालय अशा गोष्टी पोचल्यात की नाही हे बघायचे आहे, मुख्य म्हणजे गावातल्या घराघरात संडास आहे की नाही? याशिवाय आणखी इथल्या महिलांच्या काही समस्या आहेत काय ?अशा पद्धतीची माहिती मला जाणून घ्यायची आहे ".म्हणून मी सध्या महाराष्ट्रात फिरते आहे. कुठल्याही गावात गेले की मी आधी सरपंच बाईंना भेटते. त्या नसल्या तर पाटलांना भेटते, पण तुमच्या गावात सध्या सरपंचही नाही आणि पाटीलही नाहीत. टपरीवर मी चौकशी केली तर मला तुमच्या मुलाबद्दल तो खूप सोशल असल्याची माहिती मिळाली .म्हणून मी तुमच्याकडे आले."
" या या, काही हरकत नाही, बसा निवांत.पण मला यांना विचारावे लागेल ."
"ठीक आहे .काहीच हरकत नाही ."
त्यांनी मला बसायला खुर्ची दिली. सुनेला आवाज देऊन चहा ठेवायला सांगितला आणि पाणीही आणायला सांगितलं. त्याप्रमाणे पाच मिनिटात पाणी आणि चहा आला .घरचा चहा पिऊन मला आणखी बरं वाटलं. कारण खरं तर आता आतून मी जरा काळजीत पडले होते. पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी वरून ते अजिबात दाखवत नव्हते. कारण यांच्या यजमानांनी जर का मला ठेवून घेण्यास परवानगी दिली नाही ,तर पुढे कुठे जायचे,हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मसराम आणि शिंदे ही दोन नावें मी चांगली लक्षात ठेवून होते. पण गावात असे किती जणांकडे फिरायचे आणि आठ नंतर जर कुठेच आपली व्यवस्था झाली नाही तर एवढ्या रात्री परत स्टँडवर जाऊन नवीन बस मध्ये बसायचं हा एक मोठाच घोळ होणार होता .त्याचा अंदाज मला आता यायला लागला होता. आणि मनातल्या मनात मी जरा काळजीत पडले होते. पण अरुणा आणि धीर सोडेल हे तर होणेच नव्हे. बाई आत मध्ये गेल्या.त्यांचे मिस्टर खाटेवर बसून काहीतरी वाचत होते .बाई त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या .पाच मिनिटांनी त्यांच्या मिस्टरांनी ते जे पान वाचत होते त्या पानावर तुळस ठेवली आणि डोकं वर करून बायकोकडे बघितले .बाईंनी थोडक्यात माझ्याबद्दल सांगितले आणि आजची रात्र मला इथे राहायची आहे असे सांगितले. त्यांच्या यजमानांनी त्यांना सांगितले, "आधी त्या बाईची नीट चौकशी कर .जात काय हे विचार. कोणाचा काही भरोसा नाही. माझा तुकाराम गाथा वाचन सुरू आहे .मला घर बाटवून घ्यायचं नाही .आपल्यातली असंल तेली, माळी असंन तर चालल .मटन खाते का विचार .मटण खात असेल तर नाही म्हणून सांग .पूर्ण खात्री करून घे. रात्रीची तुझ्यासोबत झोपू दे.लक्ष ठेव .तू आपली झोप उक्कड ठेवशिल.सगळं बरोबर आहे ना याची खात्री करूनच बाईले घरात घे. कोनाला घरात घ्यायला, घरात आसरा द्यायला काही हरकत नाही .पण दिवस वांगला आहेत. आपल्या घरात तरणीताठी पोरगी आहे ,विजा सारखं पोरगा आहे .कोणाचा काही भरोसा नाही. तू नीट खात्री करून घे .खात्री झाली असेल तर सून बाईले व्यवस्थित स्वयंपाक करायला सांगजो. आता मी पुन्हा तुकारामाची गाथा वाचन सुरु करतो .पुन्हा माझ्याकडे येऊ नको .तू अन् विजय काय ते त्या पाहुण्या बाईचा पाहून घे".
" होय जी"
बाई पुन्हा बाहेर आल्यात. त्यांनी मला भरपूर प्रश्न विचारले ."तुम्ही मूळ कुठल्या ?तुमचं मामेकुळ काय ?मला लक्षात आलं ,त्यांना नेमकं काय विचारायचं आहे. कारण आतून त्यांचे यजमान तारस्वरात जे बोलत होते, ते मी ऐकलेच होते. त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, तरुण मुलगा, जपून राहणं, हे सारं ऐकून आता तसही माझं डोकं बिथरल होतं.त्यांना मी सरळसरळ सांगितले,"हे बघा काकू, मी आता इथून निघतेच आहे. रात्र झाली आहे, नवीन घर शोधणे मला कठीण जाणार आहे, पण तरीही मी आता तुमच्याकडे थांबणार नाही. तुमचा मुलगा सोशल आहे, हे मी ऐकले, म्हणून मी इथे आले. तुम्ही बाकी माझी कितीही चौकशी केली असती, माझ्यावर शंका घेतली असती,अगदी मी चोरी करण्याच्या इराद्याने आली की काय, असे तुम्ही समजला असतात, तरी चालले असते. पण तुम्ही सरळ सरळ माझी जात विचारत आहात. तुम्हाला मी कुणबी, तेली, माळी असेल, तर चालणार आहे, पण मी बौद्ध असेल तर चालणार नाही. मी बौद्ध नाही, पण बुद्धीस्ट आहे.तुम्हाला या शब्दाचा अर्थच कळणार नाही. पण ते जाऊ द्या.तुमच्या माहितीसाठी सांगते, मी पाटील आहे.तुम्हाला चालू शकेल, अशीच माझी जात आहे. पण आता मलाच तुमच्या घरी थांबणे जमणार नाही. कारण मी जात मानत नाही आणि जात माननाऱ्याकडे मी पाणीही पित नाही. मला उत्तम चहा पाजला, त्याबद्दल thanks."
Mi माझी बॅग उचलली, आणि दाराकडे वळून पडवीच्या बाहेर पडले.तोच आतून आवाज आला." थांबा बाई."
मी वळून पाहिलं, तर तुळशीची माळ घातलेले बाईंचे यजमान बाहेर आलेले.ते म्हणाले
" बाई.जात विचारण्याचे एकमेव कारण मी पारायण करतो. पंढरीचा वारकरी आहो. मी घरात बसून तुकारामाची गाथा वाचून राहिलो. या सप्ताहात ती संपली पाहिजे. रात्री आमच्या घरी भजन असते.मला मास मच्छी खाणारे चालत नाही आणि नवबौध्द ते खाल्ल्याशिवाय राहत नाही."
" ठीक आहे. काही हरकत नाही.मी निघते."
"नाही, तुम्ही राहू शकता."
"नाही, मला आता ते शक्यच नाही."
" का? तुम्ही तर पाटील आहात न?"
"होय, पण मी मटन खाते."
" पाटील घरातली असून?"
"हो, आमच्या घरात इतर कुणीच स्त्रिया खात नाहीत, पण मी खाते. म्हणूनच आता मी निघते.सॉरी, मला माफ करा."
मी तिथून बाहेर पडले, पण आता खरेच माझे धाबे दणाणले होते.आता काय करायचे? कुठे जायचे? सव्वा आठ झालेत.इकडे तिकडे कुठेही न भटकता सरळ स्टँड वर जावे आणि जी येईल त्या बस मध्ये चढावे, असे मी ठरविले.खरे तर माझे शरीर अपमानाने धगधगत होते.त्या रागातच मी ताडताड चालत होते.
गावा बाहेर पडताच रस्त्यावर काळाकुट्ट अंधार.आधी मला भीती वाटली ती सापाची. मी सारखे माझे पाय वाजवत चालत होते.अधून मधून मोबाईल काढून त्याचा प्रकाश पाडत होते. त्यावेळी माझ्याजवळ नोकियाचे लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल होताच.हे काहीही असले तरी, हा तुटपुंजा आधार मला धीर देणारा नव्हताच. तरीही हातपाय गाळून चालणार नव्हत.मनात बरेच विचार येत होते, तरी मी धीर धरून होते.माझ्या मागे कुणीतरी चालत असल्याचे भास मला होत होते. मी खाली बघून चालत होते. कारण साप असलाच तर आपल्याला आधीच दिसायला हवा. स्वतः ला "घाबरु नकोस" असे सजेशन सारखी देत होते.आणि तेवढ्यातच त्या अंधारात खाली मान घालून चालत असल्यामुळे मी धाड दिशी कुणावर तरी आदळले.....आणि माझी पाचावर धारण बसली.माझ्या ह्रदयाचे पाणी पाणी झाले. माझ्या पायातील पूर्ण त्राणच गेले.
कुणाचे धुड होते ते?
उद्या वाचा