'#तृप्ती #दादा मला सर्वात जास्त सध्या येणाऱ्या कमेंट्स..'

Update: 2020-03-05 17:00 GMT

#तृप्ती #दादा मला सर्वात जास्त सध्या येणाऱ्या कमेंट्स.... कदाचित माझा हेअर कट तसा आहे म्हणून येतात आणि एखादी मुलगी जेव्हा मुलांपेक्षाही जास्त आक्रमक काम करून दाखवते ,तेव्हाच तिला ही पदवी दिली जाते. ज्यांनी कमेंट्स लिहिल्या त्यांनी कदाचित माझ्यावर लोकांनी हसावं, मला त्रास व्हावा म्हणून लिहिल्या असतील.

परंतु मी यात खूप वेगळा सकारात्मक विचार करते ,कारण जेव्हा "स्त्री पुरुष समानता" यावी यासाठी आम्ही काम करतो तेव्हा आपल्याला जर कोणी "दादा"म्हणत असेल तर नक्कीच अभिमानास्पद आहे, आपल्याला समानतेचा अधिकार मिळत आहे आणि त्याचा मनापासून मी स्वीकार करेन....

आतापर्यंत अनेक वेळेला "दीदी, ताईच "लोकांकडून म्हणण्यात आले. पण जेव्हा "दादा"ही पदवी मिळाली तेव्हा खऱ्या अर्थाने मला विरोध करायचा ,म्हणून सूडबुद्धीने जरि या कमेंट आल्या असतील तरी मला मुलासारखाच दर्जा देऊन ताई ऐवजी दादा म्हणायची सुरुवात म्हणजे "स्त्री-पुरुष समानतेची नांदीच "म्हणावी लागेल.

माझा असणारा हेअरकट हा लहानपणापासूनच आहे. कारण माझ्या घरात मला मुलासारखेच वाढवले गेले. मुलगा आणि मुलगी असा कधीच भेदभाव केला गेला नाही... माझा जन्म 12 डिसेंबर 1984 चा आणि त्यावेळेला माझा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या "निपाणी"या गावात घरी मुलगी जन्मली म्हणून तिचे भव्यदिव्य स्वागत फटाके उडवून त्यावेळी आमच्या घरी करण्यात आले होते.

माझे नाव ठेवताना जे बारसे घालण्यात आले होते ते "मराठा मंडळ" या कार्यालयात. त्यावेळेला पहिली मुलगी झाली, म्हणून माझ्या वडिलांनी आणि आईने गावजेवण घातले होते... आणि खऱ्या अर्थाने आज मी महिलांसाठी काम करताना मला अभिमान आहे.

आता ही टीका, बदनामी होत असताना मला घरात सर्वांचीच साथ असते, सर्वांचाच पाठिंबा असतो कारण माझी बाजू योग्य असते.

माझ्या आईचे 2015 साली निधन झाले असून सध्या जेव्हा माझ्यावर टीका होताना माझ्या आईच्या नावाने शिव्या दिल्या जातात, तेव्हा खूप वाईट वाटते आणि समोरच्या लोकांच्या बुद्धीची कीव येते...

2006 ला माझे प्रशांत देसाईंशी लग्न झाले आणि जेव्हा घरातील"रेशन कार्ड"काढले गेले .तेव्हा "कुटुंब प्रमुख"म्हणून माझ्या पतीने 2007 साली माझे नाव मोठ्या मनाने रेशन कार्ड मध्ये लावले ते आजतागायत रेशन कार्ड वर उपलब्ध आहे आणि कायम राहील. मला दहा वर्षाचा मुलगा 'योगीराज' देखील आहे. वयाने जरी लहान असला तरी तो मला आवर्जून सांगतो की ,"मम्मा तू माझी काळजी करू नको, तू तुझ्या कामात लक्ष दे...

माझ्या कोणत्याही आंदोलनात किंवा जर मी कोणताही प्रश्न लावून धरला तर आमच्या घरातील कोणीही मला यासंदर्भात दबाव आणत नाहीत किंवा माझ्यामध्ये पडत नाहीत. अशी सर्व खंबीर बाजू माझ्या घरच्यांची असल्यामुळेच मला समाजात काय टीका होत आहे, किंवा मला धमक्या, चारित्र्यहनन होत आहे, बदनामी याकडे मी खूप कमी लक्ष देते.

मला एक सख्खा भाऊ आणि बहिण आहे. मी घरातील सगळ्यात मोठी परंतु माझ्या घरी मला "मुलगाच" म्हणतात. तुम्ही दिलेली "तृप्ती दादा' ही पदवी माझ्यासाठी तरी स्त्री-पुरुष समानतेची नांदी आहे आणि मुलीला सुद्धा मुलासारखे वागवा हा संदेश आहे आणि ताईला सुद्धा आता यापुढे "दादा" म्हणायची सुरुवातच तुम्ही माझ्यापासून केली आहे असं मला वाटतं...

 

- तृप्तीताई देसाई

संस्थापक अध्यक्ष (भूमाता ब्रिगेड)

Similar News