जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी..- प्रसाद लाड

Update: 2020-03-09 08:23 GMT

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी.. मराठी भाषेतील ही म्हण अतिशय सार्थ आहे. महिलांचं समाजातलं स्थान हे निर्मिकाचं आहे. आपल्या आयुष्यातली पहिली महिला ही आपली आई असते. ती आपल्या आयुष्याला आकार देते. आज मी जे काही आहे, ते माझ्या आईने दिलेल्या संस्कारामुळे आहे. पुढे बहिण, मैत्रिण, बायको, सहकारी अशा विविध रूपांमध्ये महिला आपल्याला भेटत जातात आणि आपलं आयुष्य समृद्ध करत जातात.

राजकारणाआधी मी व्यवसायामध्ये कार्यरत झालो. व्यवसाय करत असतानाही समाजातील तळागाळीतील संघर्ष करून स्वतःचं कुटुंब चालवणाऱ्या महिलांना आम्ही नेहमीच कामामध्ये प्राधान्य दिलं. या महिलांनी अथक मेहनत घेऊन आमचा व्यवसाय वाढवला, त्याची जबाबदारी उचलली. माझ्या पत्नीने माझ्या अतिशय धावपळीच्या दिनचक्रामध्ये घर-व्यवसाय, मुलं यांची जबाबदारी लिलया उचलली. मी नेहमी अचंबित होतो की निसर्गाने महिलांमध्ये इतकी शक्ती दिली कुठून. विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्या कधीही थकत नाहीत. माझी मुलगी ही तर माझ्या साठी ऊर्जा स्त्रोत आहे.

इतकी प्रचंड शक्ती असलेल्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात, मानवी तस्करीच्या माध्यमातून त्यांना पळवून नेलं जातं, असमानतेने वागवलं जातं अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळतात तेव्हा संताप अनावर होतो. न्यायाची अपेक्षा ज्यांच्याकडून आहे, असं मायबाप सरकार अशा घटनांकडे संवेदनशील नजरेने बघत नाही तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. या वर्षाची सुरूवातच महिला अत्याचाराच्या बातम्यांनी झाली. हिंगणघाट, सिल्लोड आणि त्यानंतर सुरू झालेली मालिका थांबेचना. दुसरीकडे सरकार मात्र आपले 100 दिवस साजरे करतंय. आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सरकारला सांगावसं वाटतं, की थोडीशी संवेदनशीलता बाळगा नाहीतर तुमची शंभरी भरल्याशिवाय राहणार नाही.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या कामात भारतीय जनता पक्षाने गप्पा कधीच मारल्या नाहीत, तर प्रत्यक्ष काम करून आदर्श घालून दिला आहे. राज्यातील सर्वाधिक महिला आमदार भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत, यापेक्षा याचा पुरावा तो काय. आज महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिलांना शुभेच्छा देत असताना एक विनंती ही कराविशी वाटते. महिलांनो, स्वतःला कमजोर समजू नका. हा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे. आपण सर्वांनी मिळून एक सुरक्षित समाज घडवूया. तुमच्या सर्व संघर्षात मी तुमच्या सोबत आहे.

- प्रसाद लाड, आमदार

Similar News