दरवर्षी 8 मार्च साजरा करत असताना मनामध्ये दोन भावना असतात. हा दिवस साजरा करावा की करू नये. विविध क्षेत्रात महिलांच्या योगदानाचा जागर करण्याचा हा दिवस, त्याचप्रमाणे महिलांच्या संघर्षाची उजळणी करण्याचाही दिवस. यंदा वर्षाच्या सुरूवातीलाच महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यांनी झाली. महिला अत्याचार हा अत्यंत चिंतेचा विषय झालाय. महिला दिनाच्या निमित्ताने महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मी व्यक्तिशः गेली अनेक वर्षे महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करतेय. महिलांना रोजगार मिळावा म्हणून टेक्सटाइल पार्क असो किंवा आरोग्य, पाणी या क्षेत्रातलं काम असो. महिला हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू राहिलाय. पाण्याच्या क्षेत्रात काम करायला सुरूवात केली तेव्हा डोळ्यासमोर एकच मुद्दा होता. पाण्याच्या कमतरतेचा सगळ्यात जास्त फटका महिलांनाच बसतो. पाणी भरणं हे महिलांचं काम. अनेक महिलांचं आयुष्यच पाणी भरण्यात संपून जातं, त्यानंतरची आजारपणं यामध्ये बाई खंगून जाते.
स्वच्छतेचा विषय ही महिलांशी संबंधित आहे. घराघरात शौचालयं आली, गावं स्वच्छ झाली, आजारपणं कमी झाली. महिलांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली. या गोष्टी वरकरणी छोट्या वाटत असल्या तरी महिलांचं अख्खं आयुष्य या गोष्टींभोवती फिरत राहतं. हाताला काम मिळाल्याने त्या स्वावलंबी झाल्या, सार्वजनिक जिवनात सक्रीय झाल्या, निर्णय प्रक्रीयेत आल्या, निरोगी आयुष्य जगू लागल्या.
महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं तसं समाजामध्ये आपल्याला प्रगती दिसायला लागली. एक मुलगी शिकते तेव्हा अख्खं घर शिकतं आणि अख्खं घर शिकतं तेव्हा समाज शिकतो. आता या शिकलेल्या समाजाला महिला दिनाच्या निमित्ताने विनंती आहे, आता या मुलीचं रक्षण करणं तुमची जबाबदारी आहे. मला दोन मुलं आहेत. मी लहानपणापासून त्यांना एक संस्कार दिलाय, महिलांना आदराने वागवा, त्यांना वाकड्या नजरेने पाहू नका, त्यांचं रक्षण करणं तुमची जबाबदारी आहे, त्यांना सक्षम करणं तुमची जबाबदारी आहे.
मला वाटतं प्रत्येक आईने जर अशी शिकवण आपल्या मुलांना दिली, आणि मुलं चुकल्यानंतर वेळीच कान पकडला तर समाजातील अनेक चिंता अशाच कमी होऊन जातील. या महिला दिनाच्या निमित्ताने इतकं करायला काय हरकत आहे.
- सुनेत्रा पवार
अध्यक्षा, एन्वायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया