अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे वस्त्र!
त्यात सध्याच्या काळात वेशभूषेला प्रचंड महत्व आलेलं, आणि विशेष म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत वस्त्र परंपरेची अभिमानी धरोहर आहे ! हे लक्षात घेऊन त्यातील कलमकारी पद्धतीला नव्या जमान्यात अनोख्या पद्धतीने सादर करून सर्वांना चकित करून टाकणाऱ्या एका जिद्दी तरुणीची सत्यकथा आज सांगतोय।
भोपाळच्या वैद्य घराण्यात जन्मलेली ही तरुणी, सरकारी सेवेत वडील, आई संस्कृत शिक्षिका, घरी सगळं शैक्षणिक वातावरण व त्या ओघाने येणारे नोकरी बेस्ट ही मानसिकता! मात्र या तरुणीने ते नाकारलं अन स्व हिमतीवर जणू राज्य उभं केलं!
तर ही अश्विनी..
एम कॉम झालेली, लग्नानंतर गोखले होऊन 1998 मध्ये पुण्यात आली, मिस्टर सॉफ्टवेयर कंपनीत, एक मुलगा इंजिनियरिंग कॉलेजला शिकतोय आणि अचानक नियतीचा घाव पडला, मिस्टर देवाघरी गेले, ऐन बहरात संसार येत असताना अशी ही दुःखाची सुनामी कोसळली। सासू सासरे दुरप्रांती अजमेरला, माहेर भोपाळला, अन ही इथं एकटी आपल्या पिल्लासह!
सिमबॉयसिस मध्ये HOD असलेल्या बहिणीसह अनेकांनी त्यावेळी एकच सल्ला दिला की, सरळ जॉब कर, तरच जगशील!
पण अश्विनीच्या डोक्यात नोकरी नव्हतीच। लहानपणापासून तिला कपड्याची, त्याच्या शिलाईची, पॅटर्नची भयंकर आवड, त्यामुळे त्यातच आता करियर करायचे तिने ठरवलं!
हे सगळं तिच्याकडून जाणून घेताना मधेच थांबवून मी विचारलं की, "बाकी ठीक आहे, पण मग सुरुवातीला लागणाऱ्या भांडवलाचे काय केले?"
त्यावर तिने दिलेल्या उत्तरावर मीच स्तब्ध झालो, ती म्हणाली, "मिस्टरची जितकी काही सेव्हिंग होती ती सगळीच्या सगळी यात टाकली, आता आर या पार असा विचार केला. अन लढले,
कुणाचाही 1 रुपयांचा सपोर्ट नसतानाही तिने हे धाडस केले, विशेष म्हणजे कुणी मदत केली नाही याबद्दल किंचितही कटूता मनात न ठेवता उलट ती समजते की, बरं झालं, त्यामुळे मला एकटीला लढायचं आहे हे कळलं, यासाठी उलट त्या सगळ्याची मीच आभारी आहे।
मात्र, तरीही आठवणीने नंतर तिने खास काही व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी फोन करून कळवलं की, "सुनंदाताई पवार, सविता खोरे, रजनी बापुर, मेधा दिवेकर, गौरी ढोले पाटील, गायत्री चावरेकर, चंद्रीका नवगण किशोर, राजेश्वरी जोहराळे व नियर डियर अनेकांनी काही न काही पाठबळ दिले, हे महत्वाचे! (हा उमदेपणा मला जास्त आवडला)
आणि मग तिने कलमकारी प्रकारात लेडीज व जेन्ट्स साठी ड्रेस तयार करणं सुरू केलं, साऊथ मधून कच्चा माल आणून मग इथे डिझाइनपासून कटींग व शिलाई पर्यत सगळं एकटीने तिने केलं. दिवसभर ऑर्डर्स घ्यायच्या व रात्री उशिरापर्यंत जागून ते कटींग करून ठेवायचे, सकाळी मग मुलाचे सगळे आवरून त्या स्वतः मग शिलाईला बसायच्या, ना कधी सुट्टी ना कधी, सिनेमा ना कधी विरंगुळा, फक्त काम आणि काम, हेच करत गेली आणि शेवटी अल्पावधीत आकाशाला तिने मुठीत घेतलेच..
R and D करत करतच अश्विनीने आज स्वतःचा असा ब्रँड केलाच!
ड्रेस शिवताना काही चिंध्या उरतात तर त्यातून तिने मग छोट्या पर्स, ऍक्सेसरीज, टाय अस बनवण्याचं अनोखा पॅटर्नच जणू केला आणि त्याची दखल मग सगळ्यांनी घेतली। सिटाडेल सारख्या राष्ट्रीय मासिकातून त्यांची ही वस्त्र कारागिरी झळकली, सर्वत्र बोलबाला झाला, निम्मं पुणे यांच्या कलाकारीच्या प्रेमात!
तिची अजून एक खासियत म्हणजे केवळ फोटो पाहून त्या व्यक्तीचे परफेक्ट माप ती सांगू शकते व त्यानुसार कपडे शिवून देते! समोर उभ्या असलेल्या व्यक्तीबद्दलही असेच। शक्यतो डोळ्याच्या मापावर तिचा विश्वास! अजब आहे न हे सगळं?
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे जाकीटही तिने असेच फोटो पाहून बनवून दिले, त्यांनीही त्याला दाद दिली.
एक सुखद धक्का मलाही तिने दिला की, 'डीडी, तुमचा शर्ट नंबर 42 असणार, चेक करून सांगा!'
अन मीच उडालो कारण तोच नंबर होता, तिला माझ्यासाठी पण जाकीट करायचं होतं त्यासाठी सहज मला कॉल केलेला, तेव्हा हा किस्सा घडलेला!
जिद्दीने लढताना आता यश आले असले तरी लास्ट इयरलाच मोठा सेटबॅक बसल्याचे तिने सांगितलं, त्या काळात सगळ्याच क्लॉथ इंडस्ट्रीला फटका बसलेला, त्यामुळे तिचे सगळं पुन्हा शून्यावर आलं, इतकं की, उद्याची भाजी आणायला पैसे नाहीत, अशी अवस्था!
नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे "जॉब कर आता तरी" सांगू लागले। ते प्रेशर इतकं आलं की त्याकाळात फोन वाजला तरी त्या प्रेशरमुळे दचकत होती. मेंटली डिस्टर्ब!
मिस्टर अचानक वारले तेव्हा कुणी आलं नाही मदतीला आणि आता सगळे फक्त सल्ले देतायत हे पाहून खरी दुनियादारी तिला कळली आणि त्यातूनच पून्हा तिने जिद्दीने उठून फिनिक्स भरारी घेतली.
एका जिवाभावाच्या मैत्रिणीने दिलेल्या थोड्या उसन्या पैशावर ती तिरुपतीला गेली, नंतर सिद्धीविनायकला गेली! दोन्हीकडे तिने तिच्या आगामी वस्त्र प्रदर्शनाचे इंव्हीटेशन कार्ड पायाशी ठेवून व आशीर्वाद घेऊन पुण्यात आली, तिसऱ्या दिवशीपासून प्रदर्शन सुरू झाले अन ते प्रचंड गाजले। अगदी मुंबईपासून इतर गावावरून लोक येऊन ड्रेस खरेदी करून गेले। पाहता पाहता पुन्हा अश्विनीने झेंडा फडकवला।
ती सांगत होती, 'जणू त्या प्रदर्शनात सगळे देवच ग्राहक रुपात येऊन दर्शन देऊन गेले! किती मस्त न!!'
मी मधेच थांबवून तिला विचारलं की, 'या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही सल्ला दे न!
ती म्हणाली, " एकच सांगेन की या क्षेत्राला मरण नाही पण पेशन्स प्रचंड ठेवावा, इथं इन्स्टंट काही मिळत नाही पण दर्जा टिकवला तर लोक चार पैसे जास्त द्यायला तयार होतात. म्हणून क्वालिटीशी तडजोड करू नका, मी स्वतः 10 महिलांना ही कला मोफत शिकवतेय जेणेकरून ही कला टिकून पुढे वाढेल। पण त्यांना अट हीच आहे की शिकल्यावर त्यांनी नोकरी न करता स्वावलंबी उभं राहावं!
अश्विनीचे हे काम कोणत्याही सामाजिक कामा इतकेच तोलामोलाचे आहे!
डीडी क्लास : आता चेरी ऑन टॉप सांगतो... या अश्विनीची भारतातील अशा प्रकारच्या अनोख्या काम करणाऱ्या पहिल्या 100 महिलांमध्ये निवड झालीय. याच महिन्यात दिल्लीत फिक्की (FICCI) तर्फे मा, नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान होणार होता, फक्त सध्याच्या लॉक डाऊनमुळे तो पोस्टपोन आहे.
पण एकेकाळी भाजीला पैसे नसणारी अश्विनी आज देशातील पहिल्या 100 मध्ये निवडली जातेय, अजून काय हवं! त्यामुळे आज वेगळा डीडी क्लास काही नाही, पुन्हा एकदा ही पोस्ट वाचा, तोच आजचा क्लास, आणि यातून विविध ठिकाणी अजून दहा वीस अश्विनी गोखले निर्माण झाल्या तर पोस्ट सार्थकी व तिचे श्रमही सुफळ संपूर्ण !!!
- धनंजय देशपांडे