महिलांना सैन्यदलात पर्मनंट कमिशन म्हणजेच निवृत्त होईपर्यंत सेवा देण्याच्या सर्वोच्च न्यायलायच्या निर्णयाचं कौतुकच करायला हवं. याआधी पुरुषसत्ताक असलेल्या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांना फक्त 14 वर्षे सेवा देता यायची त्यामुळे त्यांना निवृत्तिवेतनही मिळत नसे. पण आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या स्त्रियांना अजून एका मार्गाने स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
ही बातमी वाचून आनंद तर झाला. पण योगायोग बघा.. 2019 मध्ये आलेला मर्दानी 2 सिनेमा अजून मी पाहिला नव्हता. पण कालच रात्री तो पाहण्याचा योग्य आला आणि सद्यस्तिथीतील दाखवण्यात आलेलं भीषण वास्तव पाहून मन सुन्न झालं. मालिका, सिनेमा, वेब सिरीज हल्ली समाजमनाचा जिवंत आरसा बनू पाहतंय. जे सत्यात होतंय त्याची दाहकता आणि मग शेवटी जनजागृती अशा रीतीने केली जातीये हे चांगलंच आहे.
एक असा विकृत... ज्याच्या बालमनावर परिणाम झाल्याने, बालमन दुखावल्याने, स्त्रियांविषयीचा चुकीचा समज मनात अगदी घट्ट पाय रोवून उभा राहिल्याने, आई-बापातील भांडणाचा चुकीचा निष्कर्ष लावल्याने, तसंच बाई ही पुरुषाच्या पायातील वहाण आहे आणि तिने तो पाय सोडून डोक्यावरील मुकुटातील हिरा बनण्याची स्वप्न पाहणं अक्षम्य गुन्हा आणि पाप आहेत अशा ठाम मतांमुळे.. पुढे जाऊन पट्टीचा रेपिस्ट सोबत खुनी बनतो. 24/7 पोलिसांच्या आसपास राहून त्याच्याविरोधात रचलेला सापळा ऐकतो. त्यातूनही आपल्याला शिक्षा देण्यास सरसावलेली ही एक स्त्री अधिकारी आहे हे समजताच त्याचा अहंकार दुखावतो आणि स्वतःला शिक्षा होईल हा विचार सोडून तिला चुकीचं सिद्ध करण्यासाठी तो धडपड सुरू करतो.. अशी एकंदरीत कहाणी.
त्यातही एक महिला अधिकारी आपल्यापेक्षा पुढे जातीये, संपूर्ण डिपार्टमेंटमधील पुरुषांना ऑर्डर्स सोडते, तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला अरोगंसचं लेबल लावण्यापासून वागणुकीतला बेशिस्तपणाचा ठप्पा मारण्यापर्यंत अनेक आरोप केले जातात. पण जी हरेल ती नारी कसली.. असली जळकी बांडगुळ सर्वत्र वाढतात त्यांना दुर्लक्षित करून ती शेवटपर्यंत आपल्या कामावर फोकस करून लढत राहते. सोबतच अशी ड्युटी निभावताना कुठेच ती तिच्यातील हळवी स्त्री, माणुसकी, कामावरील भावनिक निष्ठा आणि व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबियांप्रती वेळोवेळी काळजी दाखवण्यास विसरत नाही. शेवटी आज प्रत्येक धैर्याचं काम घेऊन जगात ओळख बनवू पाहणाऱ्या स्त्रियांना संपवणाऱ्या बलात्काऱ्याला, अहंकाऱ्याला बदड बदड बदडते.. तेसुद्धा भर रस्त्यात...!
हा शेवट मनाला फार भावला... अशी कडक शिस्तीची, स्वाभिमानी, स्पष्टवक्ती, शारीरिक-मानसिक दृष्ट्या खमकी असलेली ही स्त्री..अंगावर खाकी घालूनही मनातील मायेचा पदर, हृदयातील दयाळू स्वभाव आणि हळवेपणाला कुठेही गालबोट न लावता.. समाजाला न्याय देतानाच स्वतःला सिद्ध करत राहते. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. हे डोळ्यांत खुपण्यापेक्षा स्त्रीचं खुलणं मानून जगाने तिच्या विविधरंगी गुणांचा गौरव करायला हवा..!
- प्रतीक्षा मोरे