मोनिकाला मिळाले नवे हात... आयुष्याची नवी सुरूवात

Update: 2020-09-26 16:19 GMT

२०१४ मध्ये घाटकोपर इथे रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. पण आता तिला नवीन हात मिळाले आहेत. कुर्ला येथे राहणा-या २४ वर्षीय मोनिका मोरे हिला शनिवारी ४ आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिच्यावर २८ आँगस्ट रोजी तब्बल १६ तास दोन्ही हातांच्या प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता तिच्या प्रकृतीमध्ये खूप चांगली सुधारणा झाली असून ती पुढील नवीन आयुष्यासह 6 वर्षानंतर पुन्हा स्वावलंबनाने जगण्याचा प्रयत्न करणार आहे.

अपघातत दोन्ही हात गमावल्यानंतर मोनिकाला कृत्रिम हात लावण्यात आले होचे. तिने त्या कृत्रिम हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगण्याचा प्रयत्न काही महिने केलाही. पण तिला प्रत्यक्षात ते हात खूप उपयोगाचे नाहीत असे तिला जाणवले.

त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईच्या ग्लोबल रूग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. अनेक प्रसंग असे आले की त्यावेळी मोनिकाला अवयव दात्यांकडून हात उपलब्ध होऊ शकले असते. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या कुंटूंबियाकडून हात दान करण्यासाठी कोणी तयार होत नसल्याने ही शस्त्रक्रिया रखडली होती. पण चेन्नईतील ३२ वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहेत. चार्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले होते. रात्री उशीरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली होती. तब्बल १६ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोनिकाला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

‘‘हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. पण आता हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. रूग्ण प्रत्यारोपणाच्या तिस-या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे” अशी माहिती मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी दिली.

डॉ.सातभाई यांनी असेही सांगितले की “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी ३-४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हातांच्या स्नायूतील टिश्यू आणि हाड तोपर्यंत बरे होतील. रूग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्य़ासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल व्यायाम व फिजिओथेरपीव्दारे झाली की ती लवकरच अधिकाधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दिड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता चार आठवडे पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिला फक्त गोळ्या सुरू आहेत. रूग्ण खुप चांगल्या प्रकारे पुर्ववत होत असून उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. हे लक्षात घेऊन मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचं आहे.”

हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे मोनिकाला संसर्गाची शक्यता असल्याने कुटुंबियांना तिला भेटता येत नव्हते. अशा स्थितीत कुटुंब तिच्याशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. ”तसेच संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी तिला घरीही काही महिने वेगळे ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात पुर्णता काळजी घेत कोणत्याही सामाजिक अथवा गर्दीच्या वेळी बाहेर जाण्यास मनाई आहे.

मोनिका मोरे म्हणाली, “मला नवीन हात मिळतील, असा माझा ठाम विश्वास होता. आता माझं स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. हात गमावल्याने कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती. पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन. याशिवाय, चित्र काढणे, आंघोळ करणे, स्वयंपाक आणि केस बांधणे ही काम मी स्वतः करु शकेन, याचा मला आनंद आहे. मला मिळालेल्या या नवीन आयुष्यासाठी माझे कुटुंबीय, अवयवदाता आणि डाँक्टरांचे मी आभार मानते.”

ग्लोबल रुग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक तलौलीकर म्हणाले की, "चेन्नईमधील एका ब्रेनडेड व्यक्तीने हात दान केल्याने मोनिकाला नवीन आयुष्य मिळाले आहे. महाराष्ट्रातील ही पहिली यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मला आशा आहे की ही यशस्वी शस्त्रक्रिया इतर अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रूग्णांना आशा मिळवून देईल आणि विशेषत: अन्य अवयवांसह हात दान करण्यासाठी ही लोक पुढाकार घेतील."

Similar News