तीन जुलै रोजी व्हाट्सअपवर एक संदेश फिरत होता. महात्मा जोतिबा फुले यांनी तीन जुलै १८५१ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याबद्दल अभिवादन करणारा तो संदेश होता. अनेक भाबड्या लोकांनी त्याचा प्रसार केला. जोतिरावांच्या कार्याबद्दलचा आदर आणि त्यांच्या कार्याचा प्रसार म्हणूनही अनेकांनी त्याकडे पाहिले. परंतु त्यामागचे राजकारण बहुतेकांच्या लक्षात आले नाही. ते राजकारण आहे, जोतिराव फुले यांचे श्रेय हिरावून घेण्याचे.
सनातनी मंडळींना जोतिरावांबद्दल असुया का वाटते याच्या तपशीलात जाण्याचे इथे कारण नाही. परंतु मुलींची पहिली शाळा जोतिरावांनी सुरूच केलेली नाही, असा दावा ही मंडळी करतात. काही लोक अज्ञानामुळे, करतात मात्र बहुतांश लोक मुद्दाम ती मोहीम चालवतात. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचे प्रयत्न सुरू असतात आणि सध्याचा सोशल मीडियाचा प्रभाव ही पर्वणी ठरत आहे.
जोतिरावांनी मुलींची पहिली शाळा १८५१ मध्ये सुरू केली, असे रूढ केले की, मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचा दावा आपोआप निकालात निघतो.
जोतिरावांचे श्रेय हिरावून घेण्यासाठी मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नावही पुढे केले जाते. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे नाना शंकरशेट असा उल्लेख करून जोतिरावांच्याबद्दल संशय निर्माण केला जातो. नाना शंकरशेट यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरू केल्याचे रूढ करण्याचा प्रयत्न केला जातो.
यासंदर्भातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे ?
धनंजय कीर यांच्या ‘महात्मा जोतीराव फुले’ या १९६८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात, ‘स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे जोतीबा हेच पहिले भारतीय होत.’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जोतिबांची शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात १८४८च्या ऑगस्ट महिन्याच्या आसपास सुरू झाली असावी असे या शाळेसंबंधी ‘बॉम्बे गार्डियन’ वर्तमानपत्राच्या २८ नोव्हेंबर १८५१च्या अंकात जे पत्र प्रसिद्ध झाले आहे त्यावरून अनुमान काढता येते. जोतिबांचे सहकारी सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे व सदाशिवराव गोवंडे हे त्यांना ती शाळा चालविण्यात आर्थिक सहाय्य करीत असत. (पृष्ठ ३०-३१)
एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींकरता पहिली शाळा कलकत्त्यात १८१९ साली तेथील अमेरिकन मिशनने सुरू केली. त्याकाळी मुली शाळेत आणण्याकरिता शिक्षकाला प्रत्येक दिवशी घरोघरी जावे लागे. मुलींनी शाळेत यावे म्हणून त्यांना काही विद्यावेतन द्यावे लागे. शिक्षक शाळेत ज्या प्रमाणात मुली आणील त्या प्रमाणात त्याला वेतन मिळत असे. अमेरिकन मिशनने १८४० मध्ये पुण्याच्या आसमंतात मुलींच्या शाळा उघडल्या होत्या. स्कॉटिश धर्मोपदेशकांनी चालवलेली एक मुलींची शाळा पुण्यात होती. सुमारे दहा मुली तीत शिकत असत. ती ख्रिश्चनांची शाळा असल्यामुळे चालू शकली नाही. स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे जोतीबा हेच पहिले भारतीय होत. जोतिबांची शाळा आणि त्यांचे ते शैक्षणिक कार्य जवळजवळ पाच-सहा महिने चालले.
जोतिबांच्या वडिलांनी त्यांना पत्नीसहित घराबाहेर काढल्यामुळे त्यांची ती शाळा बंद पडली. त्यानंतर जोतिबांनी तीन जुलै १८५१ रोजी बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचा याही शाळेत जाता-येताना छळ झाला. आपल्या संस्थेच्यावतीने जोतिबांनी १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. पहिल्या शाळेची परीक्षा १६ ऑक्टोबर १८५१ रोजी बुधवार पेठेत घेतली. जोतिबांच्या शाळेची १७ फेब्रुवारी १८५२ रोजी प्रकटपणे परीक्षा घेण्यात आली, तो समारंभ पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. (पृष्ठ ३५-३६)
जोतिरावांच्या आद्य चरित्रकारांपैकी एक असलेल्या पंढरीनाथ सिताराम पाटील यांनी १९३८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले यांचा अल्पपरिचय’ या पुस्तकात यासंदर्भात म्हटले आहे की, ‘बरोबर १८४८च्या आरंभीची गोष्ट. ज्योतिरावांनी पुण्यास बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यावेळी याकामी त्यांना रा. जगन्नाथ सदाशिवजी या सद्गृहस्थाने बरीच मदत केली. या शाळेमुळे पुण्यात धर्म बुडाला (?)म्हणून हाहाकार झाला व स्त्रीशिक्षणासारख्या पवित्र कार्यास त्यांना चोहोकडून विरोध होऊ लागला. या विरोध करणारांनी जोतिरावांच्या साध्याभोळ्या वडिलांचे गोविंदरावांचे डोके भंडावून सोडले. मुलगा आणि सून तुमच्या कुळास बट्टा लावीत आहे, असे त्यांना पटवून देण्यात ही मंडळी यशस्वी झाली. त्यातूनच गोविंदरावांनी जोतिराव आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.’
जोतिरावांच्या १८४८च्या मुलींच्या पहिल्या शाळेसंदर्भातील पुराव्यांची पुष्टी नंतरच्या काळात डॉ. य. दि. फडके, डॉ. हरी नरके Hari R. Narke या अभ्यासकांनीही केली आहे. धनंजय कीर म्हणतात ऑगस्टमध्ये, पंढरीनाथ पाटील म्हणतात बरोबर १८४८च्या आरंभी. काही महिन्यांचा फरक आहे, पण १८४८ सालाबाबत एकमत आहे.
नाना शंकरशेट यांच्यासंदर्भात ज्येष्ठ संपादक अरूण टिकेकर यांनी २०१५ मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्या वहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांत नाना शंकरशेट होते. या संस्थेने आपली कात अनेकदा टाकली, प्रत्येकवेळी आपले नावही बदलले. या संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या अवतारात मुलींनाही शिक्षण देण्याचा विचार झाला. त्याला सनातनी मंडळींकडून खूप विरोध झाला. तरी नानांनी आवश्यक धनराशीची सोय केल्यामुळे या सोसायटीने मुलींसाठी पहिलीवहिली शाळा सुरू केली.’
मराठी विश्वकोशाच्या सहाव्या खंडामध्ये स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटीची स्थापना १८४८ मध्ये आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींच्या शाळेची स्थापना १८४९ साली असा उल्लेख आहे.
मराठी वीकिपीडियावर मात्र कुणीतरी चावटपणा केल्याचे स्पष्ट दिसते. इथे सोसायटीची स्थापना १९४५ आणि शाळेची १८४८ असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख मूळ नोंदीनंतर कुणीतरी घुसडला असल्याचे लक्षात येते, कारण त्या संपूर्ण लेखातील सर्व आकडे मराठीत आहेत, हे स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी तसेच जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा स्थापन करण्यासंदर्भातील आकडे मात्र इंग्रजीमध्ये आहेत.
स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटीने सुरू केलेली आणि नाना शंकरशेट यांनी अर्थसहाय्य केलेली मुलींची शाळा १९४९ सालातली असल्याचे अनेक पुराव्यांवरून स्पष्ट होते. पण म्हणून नाना शंकरशेट यांच्या कार्याला उणेपण येतेय असे अजिबात नाही. मुंबईच्या पायाभरणीत त्यांनी केलेले काम डोंगराएवढे आहे. त्यांनी मुलींची शाळा सुरू केली तेव्हा त्यांनाही तत्कालीन उच्चभ्रू हिंदूधर्मीयांनी विरोध केला होता, हे लक्षात घ्यायला हवे. नाना शंकरशेट यांची शाळा जोतिरावांच्या आधी सुरू केलेली असती तरीही दु:ख वाटण्याचे कारण नव्हते. अजूनही तसे ठोस पुरावे पुढे आले तर त्यांचा तसा सन्मानाने उल्लेख करता येईल. परंतु मुलींची पहिली शाळा सुरू करण्यावरून जी मंडळी श्रेयवाद खेळताहेत, त्यांना नाना शंकरशेट यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यांना जोतिराव फुले यांचे श्रेय हिरावून घ्यायचे आहे. परंतु जसे नानांचे आहे, तसेच जोतिरावांचे आहे. जोतिरावांचे मुलींच्या शाळेचे श्रेय हिरावून घेतले म्हणून त्यांच्या कार्याला उणेपण येत नाही. जशी नानांच्या खांद्यावर मुंबईची इमारत उभी आहे, तसाच आधुनिक महाराष्ट्र जोतिरावांच्या खांद्यावर उभा आहे !
– विजय चोरमारे