कोरोना: संकट नव्हे संधी !

Update: 2020-03-26 02:48 GMT

कसं आहे नं, "उपचारापेक्षा आजार होऊ देऊ नये हे चांगले" या तत्वाचा मला आज अनुभव आला. गेली कित्येक वर्षे न अनुभवलेली आजची निरव शांतता अनुभवून मला पटकन वाटून गेलं, हा असा अनुभव दर महिन्यातून एकदा सामायिकपणे, ठराविक वेळी घ्यायला काय हरकत आहे? नाही का?

भूमाता, प्राणी, पक्षी, कीटक एकूणच सगळा निसर्ग यांनाही यामुळे त्यांची हक्काची नक्कीच जागा मिळेल. जगातील सगळ्या प्रकारचं प्रदूषण टाळता येईल. पेट्रोल, वीज अन्य अनेक अनाठायी खर्च, जे आज आपण करत आहोत, त्यात बचत होईल. थोडी का होईना व्यसनमुक्तीसुद्धा निश्चितच होईल!

अनेक गोष्टीं सध्या आपल्या विस्मरणात जातायत. त्यांना उजाळा मिळेल. आजकाल संयम संपलेलाच बघायला मिळतो. तो वाढीला लागेल. उतावळेपणा कमी होईल.

आपल्याला आज अनेक कामांसाठी मदतनीस लागतात. त्यांनाही थोडा आराम मिळेल. कुटुंबात एकत्रित कामं करताना अवर्णनीय आनंद होईल, तो वेगळाच. आपल्या सगळयांचे एकमेकांमध्ये चांगले स्नेहबंध तयार होतील.

रस्ते दुरुस्ती, इतर तत्सम कामे करताना कामगारांना अडचण येणार नाही. ते सहजपणे कामे करू शकतील.

आजच्या जनता संचार बंदीला संपूर्ण देशवासियांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोना बाबत सर्व प्रकारचे प्रतिबंधक उपाय आपण योजत राहू या. कोरोना, हा डोळ्याला न दिसणारा विषाणू पण त्याची ही केवढी अचाट,विलक्षण शक्ती !!!

एक देवी चमत्कार वाटतो नाही? आणि मग चमत्कार तिथे नमस्कार येतोच नं ! मला तर एकदम खूप भावनिक व्हायला झालं! सर्व देश वासीयांना या निमित्ताने माझे लक्ष लक्ष प्रणाम. आपण सर्व या संकटात एकत्र राहू या आणि यातून सही सलामत बाहेर पडू या.

लेखन: साधना ठाकूर

संपादन: देवेंद्र भुजबळ

+91 9869484800.

Email: devendrabhujbal4760@gmail.com

Similar News