“कोरोना नियंत्रणात आशा सेविकांचा अमुल्य वाटा” मुख्यमंत्र्यांचं आशा सेविकांना पत्र
राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी 28 सप्टेंबर 2020 पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे. आशा सेविका व गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याचही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 66 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर 4 हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमुल्य वाटा उचलला आहे. असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, कोविड-१९ विरोधातील लढ्यात ग्रामीण भागात करोनायोद्धे म्हणून योगदान देणाऱ्या आशा सेविकांना प्राथमिक सुरक्षेची साधनेही देण्यात आलेली नाहीत किंवा घोषित केलेले वाढीव मानधन-भत्ताही देण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी २८ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे.