‘अनेकांनी मला फेसबूकवर श्रध्दांजली वाहिली पण...’ अलका कुबल झाल्या भावूक
'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान मालिकेच्या सेटवरील २७ जणांना जणांना करोनाची लागण झाली होती. यातच जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं. या मालिकेत त्यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अलका कुबल यांना भावना व्यक्त करताना शोक अनावर झाला.
अलका कुबल म्हणाल्या की, “आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवर २२ जण करोना पॉझिटिव्ह आढळले. ते सर्वजण आता ठीक आहेत, फिट आहेत. पण ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, ज्या मला आईसमान होत्या, त्यांचं निधन झालं. आम्ही सगळ्यांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. साताऱ्याला प्रतिभा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.
चार दिवस मी त्यांच्यासोबत होते, म्हणून अशाही अफवा पसरल्या होत्या की मलाही करोनाची लागण झाली. मला तर किती जणांनी एफबीवर श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की, रसिकप्रेक्षकहो तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत. मी ठीक आहे आणि आमचं युनिट पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झालंय. सर्वांचे रिपोर्ट करोना निगेटिव्ह आले आहेत. तुमचा पाठिंबा असाच राहू द्या.”
दरम्यान, याच सेटवर अलका कुबल यांनाही करोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या सर्व विषयांबाबत अलका कुबल यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.