गेल्या पाच वर्षात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानं स्वत:मध्ये आमुलाग्र बदल करुन घेतला. या बदलाचा मुख्य आधार महासंचालनालयाची महिलाशक्ती ठरली. शांतपणे आणि आणि कोणताही गाजावाजा न करता या महिलाशक्तीने महासंचालनालयाला दिलेलं रुप आणि स्वरुप अभिमानास्पद असं आहे. या महिलाशक्तीला विन्रम अभिवादन करतानाच त्यांच्यातील काहीजणींचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो.
१) श्रीमती सीमा रनाळकर- महासंचालनालयाला दृष्यात्मक (व्हिजिबल) सर्जनशील (क्रिएटिव्ह) चेहरा-आकार-उकार देण्याची अजोड कामगिरी. शब्दश: शेकडो जाहिरातींचं अभिकल्प (डिझाइन), लोकराज्य आणि इतर प्रकाशनांच्या मुखपृष्ठांची निर्मिती, पुस्तिकांची एकहाती मांडणी. कामात सदैव तप्तर आणि गरज भासल्यास मध्यरात्रीच्या पलिकडेही कार्यरत राहण्याची त्यांची निष्ठा अनन्यसाधारण अशीच.
२)डॉ.सुरेखा मुळे- महासंचालनालयात सर्वाधिक लेख आणि बातम्यांच्या सर्जक. अर्थसंकल्प, ग्रामविकास, वने, महिलांसाठीच्या योजना, या विषयांवरचा शासकीय माहितीचा चालताबोलता कोष. गेल्या दोन वर्षात दोनशेच्या आसपास लेखांची निर्मिती.
३)श्रीमती मयुरा देशपांडे-पाटोदकर- महासंचालनालयाच्या डिजिटल क्षेत्रातील मोठ्या झेपेच्या प्रमुख सूत्रधार. अधिकारी/कर्मचारी यांना विविध कौशल्य प्राप्त व्हावं यासाठीच्या वैविध्यपूर्ण प्रशिक्षण नियोजनातल्या तज्ज्ञ.
४)श्रीमती वर्षा फडके-आंधळे- अल्पावधीतच प्रेक्षकप्रिय ठरलेल्या वन मिनिट व्हीडियो उपक्रमाची उर्जा . शासनातील अत्यंत महत्वाच्या भाषणांचा पहिला आराखडा तयार करण्याचं कसब वाखाणण्यासारखं.
५)श्रीमती कीर्ती मोहरील- महाराष्ट्र अहेड या इंग्रजी नियतकालिकास रुप आणि दिशा देण्यात महत्वाची भूमिका. माजी मुख्यमंत्र्यांच्या इंग्रजी भाषणांच्या मसुद्याचा जवळपास संपूर्ण भार यांच्याच खांद्यावर.
६)श्रीमती मीनल जोगळेकर- इंग्रजी/हिंदी/गुजराती लोकराज्यच्या घडणित मोलाचा वाटा. महाराष्ट्र आणि गांधी व महाराष्ट्र और गांधी तसेच महामानव या ग्रंथनिर्मितीत प्रमुख भूमिका. वृत्तचित्र शाखेला नवी दिशा देण्याची कामगिरी.
७) श्रीमती मनिषा पिंगळे- नव्या पालघर जिल्ह्यात, माहिती कार्यालयाची स्थापना ते त्याला आकार देण्याचं कर्तृत्व. महाराष्ट्र और महाराष्ट्र या ग्रंथ निर्मितीत प्रमुख भूमिका.
८)श्रीमती वर्षा पाटोळे,श्रीमती संप्रदा बिडकर- सांगली महापुराच्या वेळेस, युध्दभूमिवरील सैनिकांसारखी अजोड कामगिरी.
९) श्रीमती क्रिटी लाला - महाराष्ट्र अहेड या नियतकालिकाचा सर्वात भक्कम आधार. महासंचालनालयाच्या कोणत्याही इंग्रजी मसुद्याच्या अचुकतेचा एकमेव स्त्रोत.
१०)श्रीमती संध्या गरवारे- दिलखुलास कार्यक्रमातील, आपले महाराष्ट्र या लोकप्रिय वार्तापत्राच्या कर्त्याधर्त्या. दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमाला नव्या उंचिवर नेण्याची कामगिरी.
११)श्रीमती अश्विनी पुजारी- लोकराज्यची विक्री/खप - लाखांची आकडेवारी - वितरणाची आकडेवारी यांच्या अचुकतेचा पडद्याआडचा कर्तृत्ववान चेहरा.
१२)श्रीमती अर्चना शंभरकर-मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या काळात, सारं काही शून्यातून प्रत्यक्ष साकारुन जिल्हा यंत्रणेसह केंद्रीय यंत्रणेला थक्क करणारी कामगिरी.
१३)श्रीमती काशिबाई थोरात- कर्जमाफी ते कर्जमुक्ती, मदत-सहाय्य-पुनर्वसन या विषयघटकांसाठी हुकमाच्या एक्का. माहिती तत्काळ आनंदानं पुरवण्यासाठी माध्यमकर्मींमध्ये लोकप्रिय.
१४)श्रीमती ज्योती अरोरा आणि अंजू कांबळे निमसरकर- दिल्ली येथे महासंचालनालयाच्या जनसंपर्क कार्यात महत्वाचा सहभाग.
१५)श्रीमती शैलजा वाघ- दांदळे - नागपूर- अमरावती विभागाची प्रशासकीय बाजू सक्षम आणि समर्थरीत्या सांभाळण्याची कामगिरी.
१६)श्रीमती मनिषा सावळे- वेगवेगळया प्रसिध्दी मोहिमांमध्ये काटेकोर आणि नियोजनबद्द प्रसिध्दीसाठी तत्परता.
१७)श्रीमती नंदिनी घाटगे- वृत्तशाखेतील पदड्याआडचा कर्तृत्ववान चेहरा. सन्मान योजना, पत्रकार आरोग्य योजना, निवडणूक प्रवेशिका आदी कामांचं सुयोग्य-सुव्यवस्थित-सुरळित संनियंत्रण.
शिवाय इतर सर्वच महिला अधिकारी आणि सर्वच संवर्गातील महिला कर्मचाऱ्यांचा, महासंचालनालयाची कामिगिरी चौफेर करण्यासाठी मोलाचा हातभार लागलाय. या महिला सहकाऱ्यांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. या सर्वांनाच कृतज्ञापूर्वक आणि मन:पूर्वक अभिवादन.
सुरेश वांदिले