रोहन सिप्पी दिग्दर्शित आणि अपूर्व असरानी लिखित Criminal Justice: Behind closed Doors ही वेबसीरीज पाहिली.
Criminal Justice: Behind closed Doors ही वेबसीरीज लग्नानंतरच्या डोमेस्टिक एब्यूज च्या मुद्याला हात घालते. तसेच अनेक महिलांच्या बारीक-सारीक गोष्टींवर नजर टाकतेय. जे हळू-हळू त्यांचं अस्तित्व कमजोर आणि मानसिक खच्चीकरण करून त्यांचं सर्वस्व कसं हिरावून घेतलं जातंय हे दाखवण्यात आलं आहे.
अत्याचार आणि समाजाच्या नजरेत असलेली सो कॉल्ड इज्जत सगळं काही एखादी महिला कसे पचवते? अगदी असह्य झाल्यावर तिच्याकडून गुन्हा घडतो मग हा समाज तिलाच दोषी ठरवण्यामागे लागतो. समाज तिची कहाणी ऐकण्यात इंटरेस्ट दाखवत नाही यावर आधारित ही वेबसीरिज आहे.
"मनुस्मृति दहन दिवस अर्थात स्त्रीमुक्ती दिन" याचं औचित्य साधून मला या सीरिजबद्दल काही मुद्दे मांडायचे आहेत.
या सीरीजमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे. ते न्यायालयात आपली बाजू मांडताना मनुस्मृतिचा आधार घेत " यत्र नारी पूजते रमन्ते देवता" अशा वाक्याचा उपयोग करत एखाद्या महिलेनं आपल्या घरात, समाजात कसं राहिलं पाहिजे... सोबतच एक महिला धर्माला कसं अपमानित करते? याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. त्याचं बरोबर न्यायालयात एक प्रतिष्ठित वकिल असताना देखील "धर्म हाच धागा आहे ज्याने संविधानाची पानं जोडली आहे, धर्म वाचला तर संविधान वाचेल" अशा लाईन्स या वेबसीरिज मध्ये मांडल्या आहेत. त्यांच्या या वाक्याला पंकज त्रिपाठी डिनाय करत 'धर्मनिरपेक्षाची' व्याख्या कोर्टाला लक्षात आणून देतात.
प्रश्न
१. समाजातील प्रश्न सिनेमा, वेबसीरीज मध्ये मांडताना मनृस्मृतीचे विचार मांडणे गरजेचे आहेत का?
२. समाजात हळूवार पद्धतीने मनुवादी विचार पेरले जात आहे का?
३. लग्नानंतर महिलेवर होणारा समाजमान्य बलात्कार कधी गुन्हेगारीत मोडेल?
४. 'औरत' फक्त सेक्स प्रॉडक्ट आहे का?
५. महिला अत्याचारावर असलेल्या मोठ-मोठ्या कलमांची अंमलबाजवणी होते का?
महिला अत्याचारांवर अनेक सिनेमे, वेबसीरिज (लज्जा, शी, पिंक,शक्ती इ.) समाजात प्रदर्शित झाल्या आहेत. परंतु परिस्थिती जैसे थे... याला काही प्रमाणात समाजातील महिला वर्ग कारणीभूत आहेत. त्यांनी स्वतःला या बंधनात बांधून घेतलं आहे. समाजातील प्रश्नांवर आधारित चित्रिकरण करताना लेखकांची भूमिकाही फार महत्वाची आहे. एखादी परिस्थिती कोणत्या शब्दात मांडावी याचे तारतम्य लेखकांनी ठेवणं काळाची गरज आहे. तसेच लग्नानंतर होणारा समाजमान्य बलात्कार आपल्याकडे अजूनही गुन्हा म्हणून पाहिलं जात नाही. त्यासाठी कायद्यात या गुन्ह्यांची तरतूद होणं फार गरजेचं आहे. इज्जत, घर, समाज याचा विचार करत महिला स्वतःचं अस्तित्व, आत्मसन्मान विसरुन चालली आहे. त्याच बरोबर पुरुषप्रधान संस्कृती आपलं डोकं वर काढत महिलेवर मनुवादी विचारांची बंधनं लादत आहे.
- प्रियंका आव्हाड
(लेखिका पत्रकार आहेत)