आश्रमातील अनाथ मुलींच्या आयुष्याशी कोण खेळतय... ?
१८ वर्षे झाल्यानंतर आश्रमातील मुली कुठं जातात? आश्रमातील मुलींच्या लग्नामध्ये संस्था चालकांना, अधिक्षकांना इंटरेस्ट का असतो? गेल्या ५-६ वर्षातील आश्रमातील अनाथ मुली कुठे आहे... समाजाच्या देखाव्यासाठी कोण करतंय मुलींच्या आयुष्याचा खेळ? जर अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न करण्याचं तुमचं स्वप्न आहे. तर गायत्री पाठक यांचा हा लेख नक्की वाचा...;
खरंतर खूप नाजूक विषय आहे हा. अनेकांच्या भावना दुखवण्याचाही विषय आहे. पण तो नीट समजून घेतल्यास भावनेला समजूतदारपणाची जोड लागेल, इतकीच अपेक्षा करते. बाकी काही मतं इथं स्पष्ट आणि परखड मांडतेय तरच या विषय नेमकासा समजेल असं वाटतंय.
बऱ्याच जणांना अनाथ आश्रमातील, विधवेशी, गरीब घराण्यातील, अपंग मुलीशी लग्न करायचं स्वप्न असतं. सामाजिक भान म्हणून या स्वप्नांचं समाजात खूप कौतुक होत असले तरी त्यामागील वास्तव फारच भयानक असते. हे एव्हाना या लग्न झालेल्या मुल्लींना, संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ते यांना चांगलेच ठाऊक आहे. मुळात ज्यांच्या भावना खरंच कुणाचं तरी 'भलं' करावं,ही इच्छा असते त्यांच्या सामाजिक जाणिवा खूप खुज्या विचारांच्या असतात. कारण सहानुभूतीने नाती टिकत नाहीत आणि फुलतही नाहीत. त्या मुलीवर सतत दडपण असतं त्या अशा नात्याचं.
अनाथ आश्रमातील मुल्लींना लग्नाच्या मागणीत वाढ गेल्या 5,6 वर्षांपासून चालुय. आश्रमातील मुलींशी लग्न करण्याचे स्वार्थ परमार्थ दोन्ही हे दोन्ही हेतू साध्य होत असल्याने बऱ्याचदा लग्न करून घेणाऱ्या कुटुंबाची स्थिती 'झाकली मूठ सव्वा लाखाची' होते. (सन्माननीय जे कोण असतील त्यांनी कृपया वादविवाद करू नये, अपवाद आहेत, असतात मान्यच आहे मला)
आजची परिस्थिती पाहता आश्रमात लग्नाळू अनाथ मुली नाहीत. महिला आधार आश्रमात ज्या कोण मुली आहेत त्याही अनाथ नसल्याने पिडीत मुलींशी लग्न करावे लागते. ही पिडीत मुलगी थोडसं का होईना पण समाजाचं भान असलेली, चार उन्हाळे पावसाळे सोसलेली, स्वतःवर आधीच आघात झाल्याने 'ताकही फुंकून प्यायचे' या इराद्यानेच लग्नाला कशी बशी आणि बऱ्याचदा नाईलाजाने उभी राहते. तशीही महिला आधारगृहेही नेस्तनाबूत करण्याचा सरकारचा इरादा असल्याने महाराष्ट्रात महिला आधारगृहे ही बोटावर मोजण्याइतकी शिल्लक आहेत. त्यामुळे मागणी जास्त पुरवठा कमी,असं सध्याचं चित्रं पहायला मिळतंय.
बालगृहातील, महिला आश्रमातील अनाथ मुली आहेत कुठं? हा प्रश्न साहजिकच पडतो.
त्या शिकताहेत, संस्थेची आश्रीत बेडी नाकारताहेत. त्या स्वतःची ओळख 'आश्रमातील मुलगी' येवढ्यापुर्ती न ठेवता स्वतंत्र विहार करण्याची आणि कणखर अशी स्वओळख निर्माण करण्याचा प्रवासही करताहेत.
18 वर्षानंतर मुलींची कोणतीही जबाबदारी घेण्याची तयारी नसलेल्या संस्था चालकांना, अधीक्षकांना या मुलींच्या लग्नात भारी इंटरेस्ट असतो. पुन्हा संस्थेने मुलींचे लग्न लावून दिले, हे कौतुक सर्वत्र होतेच शिवाय रितसर मुलींचे 'पुनर्वसन' केले याचाही शासन दरबारी उत्तम शेरा घेऊन नोंद होते. लग्न लावून देणे म्हणजे 'पुनर्वसन होणे' या विचारांचा पगडा असलेल्या मंडळींना, सामाजिक कार्यकर्त्यांना शिक्षण, स्वावलंबन, स्वाभिमान, स्व ओळख कशाशी खातात हे माहीत नसते. त्यामुळे अशा पद्धतीने 'पुनर्वसन' केल्यावर त्या मुलींचं लग्नानंतर ही बरं चाललं आहे का? सासरी व्यवस्थित नांदतेय का? असे साधे एक फोनही संस्थेकडून केला जात नाही. सासरच्यांना भेटणं, आढावा घेणं, संस्था म्हणून आम्ही तिच्या पाठीशी आहोत, हे सांगणं तर कोसो दूर असतं. त्यामुळे मुली पुन्हा आयुष्यात एकाकी पडतात. हाच परिपाठ संस्थेतील मोठ्या तायांच्या बाबतीत घडत असल्याने आताशा संस्थेतील मुली लग्नाला तयार होत नाहीत. त्या संस्था सोडून दुसरीकडे निघून जातात आपली ओळख लपवायला.
यात खरी मेख अशी आहे की जे भयंकर अशा सामाजिक भावनेने अनाथ मुलीशी लग्न करू पाहतात त्यांना एकदाही त्या मुलीचा नीटसा परिचय करून घ्यावासा वाटत नाही किंवा या मुलीला सक्षम करण्याकरिता काही कौशल्य प्रधान शिक्षण द्यावस वाटत नाही, हे जास्त खटकतं. मग यांच्या सामाजिक भावनेवर शंका का येऊ नये?
उलट असे काही विचार करून गेल्यास परिच्योत्तर विवाह जास्त मजबूत होतील;आणि खऱ्या अर्थाने त्या मुलगी सनाथ होईल. तसे घडायला अजून वेळ लागेल,कारण सामाजिक प्रश्नांबाबत आपला समाज तेव्हढा प्रगल्भ नाही