ती सध्या अशी का वागते?

Update: 2020-07-27 10:42 GMT

अरे, हिला काय झालंय आज विनाकारणच चिडायला? रुसायला? कालपरवापर्यंत तर बरी होती, झकासपणे सगळं व्यवस्थित सांभाळत होती की… पडतो ना अनेकदा हा प्रश्न?

दोन-तीन वर्षांपूर्वी 'ती सध्या काय करते?' सिनेमाच्या निमित्ताने 'ती सध्या काय करते?' हा प्रश्न खूप जणांच्या मनात धुमाकूळ घालून गेला होता ! त्याच धर्तीवर 'ती सध्या अशी का वागते?' हा प्रश्न तर आपल्या आईबद्दल, मैत्रिणीबद्दल, बहिणीबद्दल, प्रेयसीबद्दल आणि मुख्यत्वे बायकोबद्दल पुरुषांच्या मनात सारखा डोकावतो, हो की नाही?

खूप पूर्वीपासूनच पुरुष स्त्रियांना, त्यांच्या वागण्याला समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत असे अलीकडे वाचलेले अनेक जोक्स आणि मिम्स पाहून वाटते.

उदाहरणार्थ,

Behind every angry woman, there is a confused husband thinking what wrong I did today?

या अश्या जोक्स मधून स्त्रियांचं वागणं खूपच काहीतरी कॉम्प्लेक्स असतं असं पुरुषांना वाटते असं वाटतंय. स्त्रीला समजून घ्यायचं असेल तर तिच्या शरीराला, मनाला, भावनांना, स्वभावाला नियंत्रित करणारी संप्रेरके समजून घ्यावी लागतील.

I would say, Want to know a woman? Know her hormones and their interplay !

स्त्रियांचं अख्खं आयुष्यचं या इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन, थायरॉईड अश्या संप्रेरकांभोवती फिरतं. पौगंडावस्थेत, गरोदरपणात, तिशी पस्तिशीत, रजोनिवृत्तीच्या काळात या संप्रेरकांच्या पातळीचे दुष्ट हेलकावेच तिच्या बहुतेक सर्व स्वभाव बदलांना, भावनिक स्फोटांना जबाबदार असतात. या संप्रेरकांचा परस्परावलंबी खेळ तिचं भावनिक मानसिक विश्वावर नियंत्रण ठेवत असतो.

पौगंडावस्थेतील, गरोदरपणातील, प्रसूतीनंतरच्या काळातील, रजोनिवृत्तीच्या वेळेस होणारे मानसिक भावनिक बदल याबद्दल बऱ्याचदा लिहलं बोललं जातं, पण 35 ते 45 या वयातील स्त्रियांना होणाऱ्या प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम बद्दल त्यामानाने लोकांना कमी माहिती आहे. जवळ जवळ प्रत्येक स्त्री ला मासिक पाळीच्या अगोदर काही दिवस साधारण आठवडाभर बारीक-सारीक त्रास सुरू होतात.

जसे की चिडचिडेपणा, वजन वाढणे, अंगावर सूज येणे, पोटात गच्च गच्च वाटणे, स्तन दुखरे होणे. पण काही स्त्रियांमध्ये हे त्रास जास्त प्रमाणात जाणवतात. त्यांना खूप थकवा जाणवतो चिडचिडेपणा होऊ शकतो औदासिन्य येऊ शकते, डोकेदुखी, झोप न लागणे भावनिक स्फोट,पोट फुगणे ओटीपोटात दुखणे, स्तन जड होणे आणि दुखणे अशी लक्षणे असतात. पाळी आल्यावर मात्र हे सगळं कमी होतं.

खरं तर हे हार्मोन्स म्हणजे संप्रेरकांच्या जोरदार बदलांमुळे होत असते पण घरातल्यांना याची काहीच कल्पना नसल्यामुळे ते, विशेषतः नवरे बुचकळ्यात पडतात. हा प्री मेन्स्ट्रुअल सिन्ड्रोमचा त्रास असणाऱ्या स्त्रिया या काळात खूप अस्वस्थ असतात आणि विचित्र वागू शकतात. म्हणजे उगीचच आधीचंच स्वच्छ असलेलं घर, कपाटे आवरत बसतील, नाहीतर उगीचच मुलांवर खेकसत राहतील किंवा उगीचच चिंतेचं ओझं डोक्यावर घेऊन बसतील.

कधी कधी यामुळे गोष्टी मोठी भांडणें किंवा घटस्फोटांपर्यंत जाऊन पोहोचतात. हे भावनिक बदल काही स्त्रियांमध्ये इतके प्रॉब्लेमॅटिक असतात की त्यामुळे त्या गुन्हे किंवा आत्महत्या सुद्धा करू शकतात या प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोमचे निश्चित असे निदान करण्यासाठी काही विशिष्ट अश्या टेस्ट नाहीत पण त्या स्त्रीला इतर काही मानसिक आजार नाहीत ना किंवा स्तनांचे आजार नाहीत ना हे पाहून त्याचं निदान केलं जाऊ शकतं.

खरंतर तिशी, चाळिशीतल्या जवळजवळ 50 टक्के स्त्रियांना हा त्रास उद्भवू शकतो. औषधांनी आणि कौन्सिलिंगने जरी यातील बऱ्याचश्या लक्षणांना आपण आराम देऊ शकत असलो तरी काही काळजी पेशंटने घेणे गरजेच असतं.

थोडं चहा, कॉफी आणि एकूणच द्रवपदार्थ हे पाळीच्या आधीच्या आठवड्यामध्ये टाळायला हवे. योग्य मापाची ब्रेसीअर स्तनांना आधार देण्यासाठी वापरायला हवी. योगासने, ध्यान आणि प्राणायाम यांनी बऱ्याच स्त्रियांना बरं वाटतं. दररोज दुपारी 2 तास झोप घेतली तर बरीच लक्षणे कमी होतात.

घरातल्यांनी सुद्धा या काळामध्ये स्त्रियांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यांना कोणताही मानसिक त्रास होऊ देऊ नये. अप्रिय विषय त्या काळात बोलले जाऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी. तिचा आहार नेहमीच प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, लोह, कॅल्शियमयुक्त असावा याची खबरदारी घ्यायला हवी.

आणि यासर्व उपायांनी आराम नाहीच पडला तर या त्रासदायक सिंड्रोमवर छान औषधे देण्यासाठी आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्या सेवेशी हजार आहोतच.

तर,

पुढील वेळी जेंव्हा ती चिडचिड करेल, उगाचच रडेल, आदळआपट करेल तेंव्हा हे संप्रेरके, प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम वगैरे लक्षात ठेवाल.

ठेवाल ना?

आणि स्त्रीला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या संप्रेरकाच्या पातळ्यांमध्ये होणारे जोरदार हेलकावे समजून घ्यावे लागतील हे ही लक्षात ठेवा!

To know a woman, know her hormones and their interplay!

  • लेखीका : डॉ. साधना पवार स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ

    डॉ. पवार हॉस्पिटल, पलूस

    obgysadhana@gmail.com

Similar News