उचकी लागली... कोणी आठवण काढतंय का? नाही, 'ही' आहेत कारणं...

एकदा दोनदा उचकी लागली तर काही वाटतं नाही मात्र उचक्या जर सारख्या येत असतील तर ते नकोस वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी का लागते? त्यामागील कारणं नेमकी काय आहेत? उचकीचे प्रकार कोणते? उचकी कशी थांबवावी? आणि डॉक्टरांना संपर्क कधी करावा? जाणून घ्या एका क्लिकवर;

Update: 2021-08-02 10:46 GMT

जेव्हा आपल्याला उचकी लागते तेव्हा कोणीतरी आपली आठवण काढतंय असं म्हटलं जातं. एकदा दोनदा उचकी लागली तर काही वाटतं नाही मात्र उचक्या जर सारख्या येत असतील तर ते नकोस वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी येण्यामागे नेमकं कारण काय आहे. आणि उचकी येण्याचे काय संकेत आहेत.

उचकी का लागते?

उचकी तुमच्या शरीरातील डायाफ्राम नावाच्या भागातून येण्यास सुरुवात होते. हा डायाफ्राम म्हणजे फुफ्फुस आणि पोटा दरम्यानचे स्नायू असतात. साधारणपणे, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा डायाफ्राम खालच्या बाजूस खेचला जातो. तर श्वास सोडल्यानंतर, तो पुन्हा पूर्वस्थितीत येतो. डायाफ्राम त्याचे कार्य एका विशिष्ट पद्धतीने करतं. परंतु जेव्हा त्याला कोणतीही समस्या जाणवते तेव्हा बदल होतो. यामुळे, हवा अचानक घशात थांबते, ज्यामुळे आवाज बाहेर पडण्यास समस्या येते. व्होकल कॉर्डमध्ये हे अचानक आलेल्या अडथळ्याने एक 'हिच' असा आवाज येतो.

उचकी या कारणांमुळे येऊ शकते...

उचकी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये काही शारीरिक आणि काही मानसिक आहेत. जास्त आणि खूप लवकर खाल्ल्यानेही उचकी येऊ शकते. खूप चिंताग्रस्त किंवा उत्साही असणं, कार्बोनेटेड पेयं किंवा जास्त अल्कोहोल पिणं देखील उचकीचं कारण ठरू शकतं. तणाव, तापमानात अचानक बदल किंवा कँडी-च्युइंग गम चघळताना तोंडात हवा भरल्यामुळेही उचकी येऊ शकते.

दीर्घकाळ राहणारी उचकी

सहसा उचकी फक्त थोड्या काळासाठी येते आणि आपोआप जाते. परंतु काहीवेळा उचकी जाण्याचं नावंच घेत नाही. हे डायाफ्रामला जोडलेल्या नसाचं काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे होऊ शकतं. कानाच्या तसंच घशाचा समस्या डायाफ्रामच्या नसांवर परिणाम करतात.

उचकी कशी थांबवावी?

उचकी थांबवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, पण काही तज्ज्ञांचा म्हणण्याप्रमाणे काही वेळ श्वास रोखून ठेवल्याने उचकीपासून आराम मिळू शकतो. या व्यतिरिक्त, कागदी पिशवीत श्वास घेणं देखील एक पर्याय आहे. यामध्ये हे दोन्ही फुफ्फुसांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड तयार करतात परिणामी डायाफ्रामला आराम मिळतो.

कधी करावा डॉक्टरांचा संपर्क?

जर तुम्हाला २ दिवसांपेक्षा जास्त काळ उचकीच्या त्रास होत असेल. तसेच त्यासोबत तुम्हाला उचकीमुळे खाणं, श्वास घेणं तसंच झोपताना त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पोटदुखी, ताप, श्वास लागणं, उलट्या होणं किंवा खोकला असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना त्याबद्दल सांगा.

संकलन - साहेबराव माने. पुणे.

Tags:    

Similar News