शिव्यांमध्ये नागडेपणाचा उध्दार करणारे आपण रणवीरच्या नग्न फोटोंवर का चिडतो?
काही दिवसांपुर्वी रणवीर सिंह ने त्याचे नग्न फोटो सोशल मिडीय़ावर शेअर केले. त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला. त्याच्याविरूध्द पोलिसात तक्रारीदेखील दाखल झाल्या. नग्नता खरंच इतकी वाईट असते का? मग आपण ती रोज शिव्यांमध्ये वापरून आपल्याच आया बहिणींचा उध्दार का करतो? जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख;
रणवीर सिंह ने त्याचे न्युड फोटोज समाजमाध्यमांवर पोस्ट केले आणि संपूर्ण देशात एकच कल्लोळ माजला. हो म्हणजे पारावरच्य़ा गप्पात आपणही सहभागी झालाच असाल की? काय तो रणवीर.. शोभतं का त्याल असे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करणं. खरं तर जितकं सोसल तितकंच सहन करावं माणसानं अशी म्हण आहे आपल्याकडे आणि तो सोसतोय की... नुसता सोसत नाहीये तर रग्गड कमाई देखील करतोय त्यातून... झालं यातून मग आपल्या संवेदना दुखावल्या गेल्या यामुळे काही जणांनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली. काय गंमत आहे पहा... शिव्यांच्या उच्चारातून आई आणि बहिणींचा अक्षरक्षः बलात्कार आपण करतो तेव्हा आपल्या संवेदना नाही दुखावल्या जात पण निसर्गाने आपल्याला दिलेलं शरीर एखाद्याने उघडपणे सगळ्यांना दाखवलं तर समाजाच्या भावना दुखावल्या जातात. आता रणवीर ला असलेलं नाक, तोंड, गाल, ओठ, हात, पाय, बेंबी, लिंग, पार्श्वभाग हा तुम्हाला, मला सगळ्यांना आहे. स्त्रियांना फक्त दोन अतिरीक्त स्तन आणि योनी आहे जी तिला पूरूषापासून भिन्न बनवते. आणि सर्व स्त्रियांना या दोन गोष्टी सारख्याच आहेत. हा आता शरीराप्रमाणे प्रत्येकाच्य़ा अवयवाच्या आकारामध्ये भिन्नता असते.
असो आपण पुन्हा एकदा रणवीरवर येउयात... कारण माहीती कुणालाच नको असते सगळ्यांना हवं असतं मनोरंजन आणि त्यातून होणारं गॉसिपींग! चला मग जर गॉसिपींग करूयात. तुम्हाला माहितीये का की असं नागडं फोटो शुट करणारा रणवीर सिंह काही पहिलाच नाहीये. हम्म्म् या आधी अभिनेता मिलिंद सोमण देखील असा चर्चेचा विषय राहिला आहे. अहो दोन वर्षांपुर्वी नाही का गोव्याच्या बीचवर नागडाच धावला होता. फक्त पुरूषच नाही तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या हास्यजत्रेतली अभिनेत्री वनिता खरात हिनं देखील भरत दाभोळकरांच्या सल्ल्याने असंच न्युड फोटोशुट केलंच होत की... तर २७ वर्षांपुर्वी याच मिलिंद सोमणने मधु सप्रे सोबत न्युड फोटोशुट केलं होतं. जेव्हा चुंबन करणं सोडा अविवाहीत जोडप्याने साधं एकमेकांच्या हातात हात घालून फिरणंदेखील पाप समजलं जायचं. तेव्हा देखील अशात पारावरच्या गप्पांना उधाण आलं होतं. हे तर मी खुपच सांगितलं. काल परवा आलेली मराठी वेबसिरीज रानबाझार मध्य़े अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका देहविक्री करणाऱ्या महिलेची भुमिका केली होती. तिला किती ऐकुन घ्यावं लागलं सगळ्यांचं. अगदी जे फक्त फेसबुकवरच पडलेले असताता त्यांचही..... its too much democracy ना....बरं काय ऐकवलं असेल तर तुला भारतीय संस्कृती माहिती नाही का? हिला देखील हिंदींचं वारं लागलं, आमच्या पोरांना बिघडवतायत या मुली... मोबाईलवर रानबाझार पाहत बसतात. किती आणि काय ते आक्षेप.....
अरे पण मुळात तुम्ही पालकांनी आधी भारतीय संस्कृती समजून घेतली पाहिजे ना... आपली मुळ भारतीय संस्कृती खजुराहोच्या मंदीरात आपली वाट पाहतेय. ते मंदीर काही फक्त पर्यटनासाठी नाहीये. संपुर्ण जगात फक्त काम संस्कृतीचं दर्शन घडवणारं ते एकमेव मंदीर आहे. जगाला आपण शुन्य दिला असं अभिमानाने सांगतो पण जगाल कामसुत्र आणि वात्सायन सारखं अमुल्य कामं ज्ञान असणारे ग्रंथ देखील आपणच दिले. मग या खजुराहोच्या निर्मात्याला तुम्ही ठरकी, काम पिपासू म्हणणार का? या ग्रंथांच्या लेखकांना आपण विकृत समजणार का? समजत असाल तर मग आपलं काही खरं नाही बुवा! कारण नग्नता ही विकृती नसून प्रकृती आहे हेच मुळात आपण स्विकारलं नाहीये. ते इतकं की आपण स्वतःच्याच शरीराला देखील बघायला लाजतो. काय गंमत आहे. आपल्याला स्वतःला आरशात नागडं बघायला लाज वाटते आणि इतरांना विशेषतः विरूध्द लिंगाच्या व्यक्तींना निर्वस्त्र पहायला आवडतं. एकंदरीत काय आपलाच गोंधळ उडालाय. जे शाश्वत सत्य आहे ते आपण लपवण्याचा प्रयत्न करतोय.
जरा विचार करा आपण कपडे का घालू लागलो. लाजेपोटी? ना....... महत्वाचे भाग झाकण्यासाठी का तर ते उघडे राहिले तर इजा होईल. म्हणुन तर आपल्याला आजही अगदी जंगलातील आदिवासींच्या वेशभुषेत पुरूष फक्त कंबरेखालचाच भाग झाकतात आणि महिला छाती आणि कंबरेखालील भाग! कालांतराने शोध लागत गेले आणि आपण संपुर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घालू लागलो. ज्यामुळे बदलत्या वातावरणात आपल्या शरीराचं संरक्षण होईल. लाजेपोटी आपण कधीच कपडे घातले नव्हते. मग तेच कपडे नसलेलं शरीर पाहायला आपल्याला कसली विकृती वाटतेय?
पाश्चात्य देशांमध्ये सगळं चालतं अशीच धारणा बहुतांशी व्यक्तींची असते. जरै तोकडे कपडे एखाद्य स्त्रीने घातले की आपला देश म्हणजे काही इंग्लंड अमेरीका नव्हे असं आपण सहज म्हणून जातो पण त्यांनी हे शाश्वत सत्य स्विकारलं म्हणुन तिथे काही जागा फक्त नग्नतेसाठी राखीव ठेवल्य़ा आहेत. न्युड बीचेस आहेत जिथे नग्नता अगदी सामान्य आहे. लोकांनाही एकनमेकांनी नग्न पाहून काहीच वाटत नाही कारण तिथे आवश्यक असलेलं लैंगिक शिक्षण दिलं जातं. तिथल्या मुलांच्या शंकांचं निरसन ज्या वयात व्हायला पाहिजे त्या वयात झालेलं असतं हे मी विकसित देशांमधील शहरांची गोष्ट सांगतोय. तिथेही कुटूंब आहेत आणि तिथेही निर्बंध आहेत पण तिथेही बलात्कार होतात पण त्याचं प्रमाण हे आकर्षणापोटी नसतं तर विकृती मुळे असतं. याचं एक उदाहरण देतो. मॉडेल आणि अभिनेत्री Scout IaRue Willis हिनं देखील तिचा पाठमोरा नग्न फोटो पोस्ट केला आहे पण तिला आलेल्या प्रतिक्रीयांमध्ये तुम्हाल कुठेच विकृती दिसणार नाही.
आपल्याकडे नग्नतेला पारच विरोध करतात असं नाही कारण त्याचा संबंद धर्माशी जोडला गेलेला आपल्याला पहायला मिळतोय. एकाच शब्दात सांगेन ते म्हणजे नागा साधू! पुन्हा एकदा आपण सेलिब्रिटींपाशी येऊयात. बऱ्याचदा या सेलिब्रिटींचं न्युड फोटोशुट हे पैशांसाठी असतं. ते फोटो पोस्ट करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. रणवीरचंच घ्या. त्याने पेपर मॅगझिनसाठी हे फोटोशुट केलं होतं पण ते भारतासारख्या देशात एक धाडसच होतं जे त्याने केलं आणि त्यासाठी त्याचं कौतुक केलंच पाहिजे. मी असं म्हणालो कारण नग्न मॉडेल्सची चित्र काढणारे दिवंगत चित्रकार एम एफ हुसैन यांना आपल्याच देशात टोकाच्या टीकेचा सामना करावा लागला होता. मॉडेल्स, अभिनेते, कलाकार यांना त्यांचा व्यवसाय करूद्यात आणि आपण आपलं काम करूयात.
कारण प्रोफेशनल नग्नतेला विरोध करणारे आपण थोडे थोडके आपण परिस्थितीमुळे नग्न असणाऱ्यांच्या अंगावर किती कपडे चढवतो, म्हणजेच काय तर नग्नता देखील आपण आपल्या सोयीनुसार घेतो. त्यामुळे एक काम करूयात नग्नतेसारख्या प्रकृतीला स्विकारूयात कारण ते निसर्गाने दिलेलं अमुल्य देणं आहे. ते एकदा आपण स्विकारलं की आपल्या पुढच्या पिढीला आपण ते शिकवू आणि आपल्या पुढच्या पिढ्या खऱ्या अर्थाने साक्षर झालेल्या असतील.