भागवत सांप्रदायातील लोक गळ्यात तुळशी माळ का घालतात?

Update: 2020-05-30 07:13 GMT

तुळशी माळ..

परमेश्वराला नैवद्य दाखवण्यासाठी, नैवेद्याचे ताट जेंव्हा भरलं जातं. त्यावेळी नैवद्य दाखवून झाल्यावर, त्यावर तुळशीपत्र ठेवलं जातं. जोवर आपण त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेऊन त्या ताटाभोवती पाणी फिरवत नाही, तोवर परमेश्वराला त्याचा भोग चढत नाही.

परमेश्वर हा फक्त वासाचा धनी आहे, त्यानंतर ते जेवणाचे ताट आपण कोणाच्याही मुखात घालू शकतो.

थोडक्यात सांगायचं म्हणजे.. वानगीदाखल, आपल्याला कोणाकडून तरी अमुक एखादी रक्कम येणार असते. पण तो मनुष्य ती रक्कम काही आपल्याला परत करत नाही. आणि आपण समजून जातो, कि काही केल्या ती रक्कम आपल्याला परत मिळणार नाहीये. त्यावेळी आपण सहज म्हणून जातो.. जाऊदेत, #तुळशीपत्र ठेवलं मी त्या रकमेवर, किंवा एखाद्या न मिळणाऱ्या इस्टेटवर. थोडक्यात, तुळशीपत्र ठेवणं म्हणजे.. तो संभाव्य विषय सोडून देणे, किंवा त्यावर #पाणी_सोडणे. असा त्याचा अर्थ होतो.

Courtesy : Social media

तर मग.. गळ्यात तुळशी माळ घालण्यामागे नेमकं काय कारण असेल?

भागवत पंथात, पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यावर, आजपासून हा देह मी पांडुरंगाच्या चरणी वाहून दिला आहे. म्हणजे, भागवत धर्माचं पालन करत असताना, या सचेत देहावर माझा असा कोणताच अधिकार उरला नाहीये. तुळशी माळ घालणे म्हणजे, आपल्या शरीरावर तुळशीपत्र ठेवल्या प्रमाणेच आहे. आपल्या शरीरावर आपण तुळशीपत्र ठेऊ शकत नाही, त्यामुळे त्या तुळशीवृक्षा पासून बनलेली तुळशी माळ आपण परिधान करतो. म्हणजेच आपल्या शरीरावर एकप्रकारे आपण तुळशीपत्र ठेवत असतो, असा त्याचा मतितार्थ होतो.

Courtesy : Social Media

परंतु..तुळशी माळ हा विषय काही लोकांनी अगदी चेष्टेचा करून ठेवला आहे. गळ्यात तुळशी माळ परिधान करणे म्हणजे, मास मच्छी वर्ज करणे, किंवा दारू न पिणे. असा काहींनी याचा अर्थ घेतला आहे. काही बेवड्या लोकांना आमच्या आळंदी मध्ये अगदी धरून आणून तुळशी माळ घातली जाते, आणि त्याला शतप घातली जाते. कि इथून पुढे आता तू दारू प्यायची नाही. यात खास करून मास मटन खाणारे जास्ती नसतात. बेवड्या लोकांचा भरणाच जास्ती असतो. पण असं करण्याने आपला भागवत धर्म बदनाम होतोय हे कोणीच ध्यानात घेत नाहीये. गळ्यात तुळशी माळ घालून कित्तेक लोकांना दारू पिऊन पडलेलं मी पाहिलेलं आहे. गळ्यातील तुळशी माळ खुंटीला टांगून दारू पिणारे आणि मास मटन खाणारे कित्तेक महाभाग मी पाहिले आहेत.

Courtesy : Social Media

गळ्यात माळा घालून कोणत्याही विषयावर ताबा मिळवता येत नाही. दारू किंवा मास मटन वर्ज करण्यासाठी, किंवा अन्य कोणत्याही विषयाचा त्याग करण्यासाठी. आपल्या मनावर ताबा असला पाहिजे. मनावर ताबा मिळवला कि, आपल्याला कोणतीही गोष्ट वर्ज करता येते. हे माहित असून सुद्धा काही लोकं आपल्या हिंदू संस्कृतीला बदनाम करत असतात, याचं मला अतोनात दुखः होतं.

 

Similar News