एका पत्रकाराला वेळेत उपचार मिळाला नाही तर सामान्य माणसाची काय व्यथा? असा प्रश्न कालपासून बरेच जण चघळत आहेत. कोणत्याही माणसाचं कोणत्याही वयात जाणं दुःखदायक असतंच. पण पत्रकार स्वतःला इतर नागरिकांपेक्षा वेगळं स्टेटस असल्याचं का मानतात? मला हा प्रश्न सतत छळतो. तुम्हाला बातमीलेखनासाठी नोकरी मिळाली आहे. नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पालिकेचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व समित्या, विधानभवन, संसद अशा शासकीय प्रशासकीय पातळीवर निवडून आलेल्या आणि नेमणूक झालेल्या व्यक्तींशी थेट संपर्क करण्याचे कर्तव्य तुम्हाला पूर्ण करायचे असते. त्यामाध्यमातून चालू घटनेला समजून त्याचे लिखाण विश्लेषणाच्या पातळीवर करण्याची तुमच्याकडून अपेक्षा असते.
लेखन माध्यमातून सगळ्यांचे शब्द विचार पोहोचवणारे पत्रकार असतात. बाकी चल भाषेत मांडणी करणारे बातमीदार हा वेगळा प्रकार. त्यांनाही सतत सध्या घडत असलेल्या घटना, त्यामधील माणसांची ओळख, विषय विशद करणं इत्यादी काम करावं लागतं. म्हणजे तशा कर्तव्यांची अपेक्षा असते. ह्यामुळे इतर कर्मचारी वर्गाला कंपनी देते तितकीच सुरक्षा तुम्हाला दिली जायला पाहिजे. पण तसं होताना मात्र दिसत नाही.
संघटन पातळीवर मतभेदांमुळे कधीही कोणी स्वतःच्या अडचणीवर तटस्थ राहून काम करायला अंतर्गत केंद्रीय व त्याचे राज्य, जिल्हा, तालुका अशा पातळीवर कार्यकारिणी बनवत नाही. सध्या आहेत त्या कार्यकारिणी अर्धा वेळ किंवा काही वेळ संघटन कामाला देऊ शकतात. मग स्वतःला इतर जनतेपेक्षा वेगळं कशाला मानता? ही वेगळेपणाची भावनाच धोकादायक आहे असे वाटत नाही का?
चालू काळात अपुरी यंत्रणा यासाठी आर्थिक पातळीवर केंद्र आणि राज्य सरकारमधील तणाव याविषयी व्यक्तिगत मतपेटीविषयीची मत लक्षात घेऊन जर तुम्ही बाकी वर्षभर कर्तव्यात कसूर करत असाल तर स्वतःच्या कामाशी संबंध असणारा माणूस याच कारणामुळे दगावल्यावर त्याविषयी बातम्या का चालवता?
कोणाचाही मृत्यू हा बातमीविषय नाहीच. त्या मृत्यूला कारणीभूत घटक मांडण्यात आपण जवळपासच्या काळात कमी पडलो याची कबुली किती पत्रकार व बातमीदारांनी दिली?
हे मी फक्त पेरोलवर कार्यरत लोकांविषयी बोलतेय. स्ट्रिंजर आणि वार्ताहर यांच्याविषयी केला जाणार अन्याय आणि शोषण ही तर खूप प्रसिद्ध लपवून ठेवलेली व्यथा आहे. तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळवण्यासाठी किमान एक दोन चाकी, फोनवर बोलण्यासाठी मोबाईल, कामासाठी लॅपटॉप ह्या किमान गोष्टी चालू काळात लागतात. त्याशिवाय ह्या दोनेक लाखांची गुंतवणूक केल्यावर काय मिळकत होते? फक्त लिखित बातमी 30 ते 50 रुपये, ती जरा मोठी असेल विषय स्वतः शोधून काम केलं असेल तर 150 रुपये पर्यंत, फोटो आणि बातमी असेल तर 70 ते 100 रुपये, व्हिडिओ असेल तर 150 ते 180 रुपये, शोध पत्रकारिता केली असेल आणि वरिष्ठांना विषय रुचला पटला तर कुठेतरी 300 ते 500 रुपये त्या बातमीला. अगदीच विषय गाजला तर फार फार तर 800 रुपये सर्वांत जास्त मिळतात.
ह्या मिळकतीतून तुम्ही इतर कर्मचारी वर्गापेक्षा स्पेशल ठरताच ओ. कारण करिअर ग्रोथ ह्याविषयी इतरांना किमान पगार दिला जातो. पदवी असेल तर किमान 10 हजार आणि पदव्युत्तर पदवी असेल तर किमान 18 हजार रुपये पगार कोणालाही पहिल्या नोकरीत मिळायला हवा. मात्र पत्रकार तब्बल 1 ते 3 वर्ष वर्षभर दरमहा हजार रुपये रोख ह्यावर काम करतात. सध्याच्या काळात हजार रुपयात काय येतं? आहे की नाही विशेष? नाव पडलंय कानफाट्या तर पडूदेच. बोललंच पाहिजे.
अलिकडे 6 वेगवेगळ्या ठिकाणांहून नोकरीविषयी विचारण्यात आलं. एकाही ठिकाणी जगायला पुरेसा पगार देण्याची ह्या माध्यम कंपन्यांची योग्यता नाही. याच कारणामुळे मी नोकरी नाकारली. का करा कमी पगारात फरफट? काम करताना तुम्हाला कौटुंबिक कार्यक्रम, वैयक्तिक काही बाबी, आरोग्याच्या तुमच्या किंवा कुटुंबाच्या समस्या आल्या तर फक्त रजा मंजूर करण्यात ह्यांचा सपोर्ट. वर बरं होण्यासाठी पुरेशी सवलत न देणं तर ठरलेलंच. मग दगावलेल्यांना बातमीचा विषय करून वेळ ढकलून मोकळे होणारच ना. हेच विशेष आहे...
- नम्रता देसाई
लेखीका बोलभाषा : शेतमाल खरेदी विक्री कंपनीच्या संस्थापक आहेत.