साधकबाधक चर्चा करून आमच्या सोसायटीने मदतनीस बायकांना बोलावलं. तसं कळवल्यावर आमची मंदा म्हणाली, घरी बसून पगार खाणं बंद होऊदे. आणि धावत आली कामासाठी. मधल्या दीर्घ काळात फोनाफोनी सुरू होती. पण भेटून मारायच्या गप्पा राहिल्या होत्या.
त्या आता मास्क आणि सुरक्षित अंतरासह सुरू झाल्या. कोरोनाचा धोका कळल्यावर त्यांच्या आंबेडकर नगर (जुन्या वाघेश्वरी मंदिराजवळ, दिंडोशी)या वस्तीने काय केलं हे तिच्याकडून ऐकून मी थक्क झाले. इतका शहाणा विचार, इतकी एकजूट, संघटित प्रयत्न...
हे ही वाचा
रंजक भाषेतल्या बावीस आजीच्या पोतडीतल्या गोष्टी
स्त्री-पुरुष नातं आणि दोन शब्द !!
देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ९४ हजारांच्या वर
ते आजतागायत प्रत्येकजण कडकपणे पाळत आहे. सर्वप्रथम काठ्या वगैरे जमवून, प्रत्येक घरातल्या जुन्या साड्या जमवून वस्तीला कुंपण घातलं. मधला, बाजूचा रस्ता सर्वांनी मिळून स्वच्छ केला. आतल्यांनी बाहेर जाताना, बाहेरून ओळखीचं कुणी येताना सावंतबाबांची परवानगी घ्यायची.
कामासाठी बाहेर गेलेल्यांनी परतल्यावर गरम पाण्याने आंघोळ करणं, कपडे धुणं हा नियम केला. दोनतीन लोकांनी जाऊन सगळ्यांचं सामान आणणं हे सुरू केलं. घराबाहेर मास्कशिवाय यायचं नाही हे पाळलं. मंदाचा मोठा मुलगा सॅनिटायजर बनवणा-या कंपनीत काम करतो. कंपनीने वस्तीसाठी सॅनिटायजरचा पुरवठा केला.
लहान मुलांच्या खेळाच्या वेळा ठरवल्या. त्यांची खेळाची जागा साफ ठेवली. मंदा सांगते, आम्ही ब-याचशा बायका बहिणीबहिणीसारख्या आहोत. संकटात एकत्र असतो. ताण घालवण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकदा पापड लाटण्याचा घाटही घातला.
त्यांनी कोरोनाधोका ओळखून वस्तीच्या रक्षणार्थ, स्वहितार्थ जबाबदारीने घेतलेले निर्णय, आखलेली SoP, त्याचं आनंदाने केलेलं पालन हे सारं केवळ लांबून कौतुक करण्यासारखं नाही, शिकण्यासारखं वाटलं मला. कोण म्हणेल वस्ती घाण असते?
- मेधा कुळकर्णी.